हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी राज्यातील टॅक्सी चालक आणि कॅब चालकांना प्रत्येकी 10 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे जगमोहन रेड्डी यांनी या योजनेला वायएसआर वाहन मित्र योजना असं नाव दिलं आहे. या योजनेमुळे आंध्र प्रदेशमधील 2 लाख 62 हजार 495 टॅक्सी आणि कॅब चालक-मालक यांना आर्थिक मदत मिळणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेच्या 4 महिने आधीच ही रक्कम वितरीत केली जाणार आहे. चालकांना लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाह करण्यास मदत व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
वायएस जगमोहन रेड्डी यांनी निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात या योजनेची घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निवडणुकीतील आश्वासनाची वचनपूर्ती म्हणून ही योजना सुरु केली आहे. या योजनेची सुरुवात 4 ऑक्टोबर 2019 रोजी झाली होती. यावर्षी ही रक्कम ऑक्टोबर महिन्यात दिली जाणार होती. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी 4 महिने आधीच आर्थिक मदत वितरीत करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी एकूण 2 लाख 62 हजार 495 टॅक्सी आणि कॅब चालक आणि मालकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जगमोहन रेड्डी यांनी आज (4 जून) 13 जिल्हाधिकाऱ्यांसह लाभकर्त्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये याची घोषणा केली.
Read More पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
यावेळी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी यांनी आपल्या 3 हजार 648 किलोमीटर निवडणूक पदयात्रेचीही आठवण सांगितली. या पदयात्रेतच त्यांनी टॅक्सी चालकांच्या अडचणी आणि प्रश्नांवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच या आश्वासनाप्रमाणे आर्थिक मदत करणाऱ्या या योजनेची घोषणा केली.
मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी म्हणाले, ‘कोणत्याही ऑटो चालक, टॅक्सी चालक किंवा मॅक्सी चालकाला खासगी सावकारांकडून प्रचंड व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येणार नाही किंवा त्यांना त्यासाठी भाग पाडलं जाणार नाही यासाठी आम्ही त्यांना आश्वस्त करतो. त्यासाठीच आम्ही ही योजना आणली आहे.’ रेड्डी सरकारला खरंतर ही रक्कम 4 ऑक्टोबर 2020 रोजी वितरीत करणं अपेक्षित होतं, मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जगमोहन रेड्डी यांनी 4 महिने आधीच पैसे वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक अडचणीच्या काळात तग धरुन राहण्यास मदत होईल, अशी रेड्डी यांची भूमिका आहे.
तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना मदत मिळाली नाही त्यांना 2 वर्षाची एकत्र मिळणार
दरम्यान, मागील वर्षी खात्याच्या माहितीतील तफावती आणि काही तांत्रिक कारणांमुळे काही टॅक्सी चालकांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. याचपार्श्वभूमीवर रेड्डी सरकारने मागील वर्षी या योजनेचा लाभ न मिळालेल्या चालकांना मागील आणि या अशा दोन्ही वर्षांची आर्थिक मदत मिळेल असंही स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी जवळपास 12 हजार 200 चालकांना तांत्रिक अडचणींमुळे ही आर्थिक मदत मिळू शकली नव्हती. त्यांना यावर्षी अधिकच्या 10 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. 2020 च्या लाभकर्त्यांच्या यादीत यावर्षी आणखी 37 हजार 756 चालकांची नावं समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी लाभार्थ्यांची संख्या 2 लाख 36 हजार 334 वरुन 2 लाभ 62 हजार 756 इतकी झाली आहे.