औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत पुढचा महापौर एमआयएमचाच होणार, असे मोठे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड मानल्या जाणा-या औरंगाबाद महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.
भाजपनेच शिवसेनेत भांडणं लावून दिली असून मुंबई महापालिका मिळाल्यानंतर भाजपचे खरे मनसुबे उघडे पडतील, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. एमआयएम टीआरपी मिळवण्यासाठी बोलतो, एमआयएम ही भाजपची बी टीम असे आरोप वारंवार केले जातात. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौ-यातही अब्दुल सत्तार यांनी असे आरोप केले होते. त्याला खा. जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबादच्या नामांतराला आजही विरोध असून केवळ राजकीय फायद्यासाठी शहराचे नामांतर होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादी गरजेनुसार सेक्युलर’
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्युलर होतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. मात्र आता मुस्लिमांची मोठी व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर गेली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठकीला बोलावले म्हणून मी आलो. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतल्याची माहितीही खा. जलील यांनी दिली. - ‘भाजपाला फक्त मुंबई हवीय’
भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीवर बोलताना खा. जलील म्हणाले, भाजपा फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणे, हाच त्यांचा उद्देश आहे. अब्दुल सत्तार फुकटचे भपके आहेत. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाहीत. - ‘औरंगाबादचा इतिहास बदलू शकणार नाहीत’
संभाजीनगर नामांतरावरून बोलताना खा. जलील म्हणाले, ‘संभाजीनगर नामांतर करण्यास आजही माझा विरोध आहे. संभाजीराजेंबद्दल माझ्या मनात आदर आहे. ज्या शहरात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही, शहराचे नाव राजकीय फायद्यासाठी बदलायचे आहे. मुसलमान औरंगजेबाला फॉलो करत नाहीत. इतिहासाचा तो एक भाग आहे. तुम्ही इतिहासाचे पान फाडू शकता पण इतिहास बदलू शकत नाहीत, असे खा. जलील यांनी सांगितले. - ‘तिरंगा ‘डीपी’त नाही तर रक्तात आहे’
हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येकाने आपापल्या डीपीत तिरंगा लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावर खा. जलील यांनी सणकून टीका केली. ‘तुमच्या आणि माझ्या पैशातून नरेंद्र मोदी पब्लिसिटी करतायेत. आम्ही झेंडा डीपीवर लावत नाहीत. तिरंगा आमच्या रक्तात आहे. लसीकरणावरही मोदींचा फोटो आहे. घरावर झेंडा नाही लावला तर तुम्ही देशद्रोही ठरवणार का?