पुणे : सुप्रीम कोर्टात सोमवार दि. ११ जुलै रोजी शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, तर काही जण शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल असे म्हणत आहे. मात्र, मी ज्या वकिलांशी चर्चा केली त्यानुसार पक्षांतर बंदी कायद्याचे तंतोतंत पालन केले तर १६ आमदारांच्या बाबत वेगळा निकाल लागू शकतो, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे गटातील ३९ आणि ठाकरे कॅम्पमधील १४ आमदारांना नोटिसा मिळाल्या आहेत. सोमवारी सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार बोलत होते. पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? त्या कायद्याची भूमिका काय आहे? सुप्रीम कोर्टात त्यासंदर्भातील प्रश्न आहेत. सुप्रीम कोर्ट निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. सुप्रीम कोर्ट विचारपूर्वक निर्णय देईल. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच मूळ शिवसेना आहे असे आम्हाला वाटते, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.