नांदेड : प्रतिनिधी
बीआरएसच्या गाडीत बसण्याची तयारी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह पुत्र शिवराज धोंडगे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडले आहे.
बीआरएस आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी नांदेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात एंट्री केली आहे. तेलंगणातील विकास कामे आणि विविध योजनांची भूरळ घालत, शेतक-यांसह वेगवेगळया पक्षातील राजकीय पदाधिकारी, नेते, माजी आमदार, पदाधिकारी यांना गळाला लावण्याची योजना आखली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक, कंधार विधानसभेचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे बीआरएसच्या गळाला लागले आहेत. माजी आमदार शंकर धोंडगे व केसीआर यांच्यामध्ये नुकतीच बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा झाली. यानंतर धोंगडे यांनी, पक्ष सोडण्यासंदर्भात पदाधिकारी व समर्थकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगीतले होते.
याप्रमाणे कंधार तालुक्यातील बाळंतवाडी येथे सोमवारी माजी आमदार धोंडगे यांची कार्यकत्यार्सोबत बैठक पार पडली. ही बैठक होताच शंकरअण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या किसान भारतीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि त्यांचे पुत्र शिवराज धोंडगे यांनी राष्ट्रवादी युवकच्या राज्य सचिव पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयवंतराव पाटील यांच्याकडे पाठविला आहे. पिता-पुत्राच्या राजीनाम्यामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडले आहे.