ठाणे : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.
ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला.
या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने ठाण्यातील शिवसेनेचे अस्तित्व पूर्णपणे पुसले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला आता ठाण्यात शून्यातून संघटना उभारावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या गोटातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आजपर्यंत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्यातील कारभार एकहाती सांभाळत होते. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यापासूनच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील एक मोठा गट फुटेल, अशी अटकळ राजकीय जाणकारांकडून बांधली जात होती.
ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात गेल्याने आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काँग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.