मुंबई : राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. पण माझा महाराष्ट्र सैनिक हालत नाही, याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. अनेकांना पैशाचे आमिष दाखवले जात आहे. पण तुमचे कडवट असणे, निष्ठावान असणे या सगळ्या गोष्टी यशात रुपांतर होतील असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. राज ठाकरे हे सध्या कोकण दौ-यावर आहेत. आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पदाधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, जानेवारीत मी पुन्हा कोकणचा दौरा करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका ठप्प झाल्या आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे मार्च-एप्रिल २०२३ मध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी मी पुन्हा कोकणात येणार आहे. मी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी योग्य होते की नाही हे पाहायला मी येणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा आपले दर्शन होईल. त्यावेळी मला जे काही मांडायचे आहे ते मी मांडेन. कोकणासंदर्भात, महाराष्ट्राबाबत तसेच मराठी माणूस आणि हिंदुत्वासंदर्भात माझे म्हणणे मांडेन असे राज ठाकरे म्हणाले.
२०० महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश
आज राज ठाकरेंनी राजापूर तालुक्यातील पदाधिका-यांची बैठक घेतली. यामध्ये गाव तिथे शाखा करण्यासाठी बैठक घेतल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. तसेच यावेळी कोकणातील रिफायनरी समर्थक देखील राज ठाकरे यांना भेटले. त्यानंतर २०० महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला.