मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौ-याला गालबोट!
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द झाला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव दिले होते. त्याचे उद्घाटन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र नामांतराच्या वादानंतर शिंदे यांच्या हस्ते होणारे उद्घाटन रद्द करण्यात आले आहे.
शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक यांनी महापालिकेच्या जागेवर उद्यान उभारले आहे. हे उद्यान त्यांनी स्वखर्चातून उभारले असल्याचा त्यांचा दावा आहे. तीन महिन्यांपूर्वी हे उद्यान उभारण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती मिळताच पुण्यातील काही सामाजिक संस्थांनी आक्षेप घेतला.
वैयक्तिक नाव उद्यानाला देता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे हे नाव नियमबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्याच नावाच्या उद्यानाचे उद्घाटन एकनाथ शिंदे करणार असल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी उद्यानाचे एकनाथ शिंदे हे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आपण विचार करू, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र सध्या उद्घाटन रद्द करण्यात आले आहे.
उद्यानावरचे नाव झाकण्याची वेळ
शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक यांनी महापालिकेच्या जागेवर उद्यान उभारले होते. हे उद्यान त्यांनी स्वखर्चातून उभारले असल्याचा त्यांचा दावा आहे. तीन महिन्यांपूर्वी हे उद्यान उभारण्यात आले. मात्र हे नाव नियमबा आहे. नाव देण्याची नियमावली असते. पालिकेच्या परवानगीची गरज असते. याची पूर्तता न केल्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आणि उद्यानावरील एकनाथ शिंदे यांच्या नावाचा बोर्ड झाकण्यात आला आहे. त्यांच्या दौ-याच्या दिवशीच त्यांच्या नावाचा बोर्ड झाकण्यात आल्याने अनेक ठिकाणी चर्चा रंगू लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना प्रभागासाठी बजेट आणून त्यांनी विविध विकास कामे केली. त्यांच्या नावावर प्रभावित होऊन या उद्यानाला एकनाथ शिंदेंचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने या उद्यानासाठी निधी उपलब्ध केला नव्हता त्यामुळे मी स्व-खर्चातून हे उद्यान उभारले होते. मात्र आता मी मान्य करतो माझ्याकडून चूक झाली, असे म्हणत प्रमोद भानगिरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.