24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रआयकर विभागाची मुंबईतल्या झोपडपट्टीतही धाड

आयकर विभागाची मुंबईतल्या झोपडपट्टीतही धाड

एकमत ऑनलाईन

औरंगाबादमध्येही सलग दुस-या दिवशी छापेमारी
मुंबई : पॉलिटिकल फंडिंगप्रकरणी आज आयकर विभागाने मुंबईत छापेमारी सुरू केली आहे. मुंबईच्या सायन आणि बोरिवलीत आयकर विभागाने झाडाझडती सुरू केली आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाने सायनच्या एका झोपडपट्टीतही छापेमारी केली आहे.

मुंबईतल्या झोपडपट्टीत आयकर विभागाने धाड मारण्याची ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. आयकर विभाग थेट झोपडपट्टीत घुसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून झोपडपट्टीवासियांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईशिवाय औरंगाबादमध्येही सलग दुस-या दिवशी छापेमारी सुरू आहे. मिड डे मिल डिलिव्हरी करणा-या सतीश व्यास नावाच्या व्यापा-याचे घर, कार्यालय आणि हॉटेलात छापेमारी करण्यात येत आहे. चार ठिकाणी एकूण ५६ अधिकारी छापेमारी करत आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्येही खळबळ उडाली आहे.

राजस्थानातील शाळांमध्ये मिड डे मिलशी संबंधित स्कॅमची लिंक आता औरंगाबादशी लावली जात आहे. कालपर्यंत आयकर विभागाने देशभरात ११० ठिकाणी छापेमारी केली. त्यात औरंगाबादचाही समावेश होता. औरंगाबादचे व्यापारी सतीश व्यास यांना राजस्थानच्या शाळांमध्ये मिड डे मिलचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळालेले आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळ्याशी याचा संबंध लावला जात आहे.

पॉलिटिकल फंडिंगच्या नावाखाली टॅक्स वाचवण्यासाठी पैशांची हेराफेरी सुरू असल्याची खबर आयकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागाने ही छापेमारी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतही वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाने आज सकाळी छापेमारी सुरू केली. त्यातच सायनमधील एका झोपडपट्टीत आयकर विभागाने छापेमारी केल्याने सर्वांचेच कान टवकारले आहेत. या झोपडपट्टीत एका राजकीय पक्षाचे ऑफिस आहे. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत आहे. पण त्याला निवडणूक आयोगाने अद्याप मान्यता दिलेली नाही.

१०० स्क्वेअर फुटांची झोपडी, १०० कोटींचा निधी
फक्त १०० स्क्वेअर फुटाच्या म्हणजे दहा बाय दहाच्या झोपडीत एका राजकीय पक्षाचे हे कार्यालय आहे. बँक रेकॉर्डनुसार या कार्यालयाला गेल्या दोन वर्षांत १०० कोटींचा निधी मिळाला आहे. म्हणजे राजकीय पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू होती. या प्रकरणी आयकर विभागाने या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाची चौकशी केली. त्यावेळी त्याने मी केवळ नावाला अध्यक्ष आहे. केवळ स्टेट्स सिम्बॉल म्हणून हे पद मी माझ्याकडे ठेवले आहे. पार्टीचे फंडिंग आणि बाकीची कामे अहमदाबादच्या ऑडिटरद्वारे केली जात असल्याचे त्याने आयकर विभागाला सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या