दुग्धजन्य पदार्थासह गहू, तांदूळ, डाळीची निर्यात वाढली
नवी दिल्ली : भारतातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात होत आहे. या निर्यातीत सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. दुग्धजन्य पदार्थासह गहू, डाळी, तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली. निर्यातीच्या संदर्भातील आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. या निर्यातीतून शेतक-यांसह व्यावसायिकांचा मोठा फायदा झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले.
परदेशातील लोकांची भारतीय फळांना आणि भाज्यांना मोठी मागणी आहे. फळे आणि भाज्यांसह दुग्धजन्य पदार्थ, गहू, डाळी, तांदूळ यांसह अनेक धान्यांची निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीची तात्पुरती आकडेवारी जाहीर केली आहे. या सर्व प्रकारच्या उत्पादनांचा डेटा आहे.
एका वर्षापूर्वी या उत्पादनांची निर्यात १५.०७ बिलियन डॉलर्स होती. ती आता १७.४३ बिलियन डॉलर्स झाली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. निर्यात वाढल्याने शेतकरी आणि व्यावसायिकांचे उत्पन्न वाढले आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये ३३.७७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे, तर बासमती तांदळाच्या निर्यातीत ३९.२६ टक्के वाढ झाली आहे, तर बिगर बासमती तांदळाची निर्यात ५ टक्क्यांनी वाढली आहे.
फळे-भाज्यांची निर्यात
२.६० टक्क्यांनी वाढली
एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत २.६० टक्के वाढ झाली आहे. ताज्या फळांच्या निर्यातीत ४ टक्क्यांनी वाढ झाली, तर अन्नधान्यांसारखी खाद्यपदार्थांची निर्यात २८.२९ टक्क्यांनी वाढल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
गहू, डाळींच्या निर्यातीत वाढ
नोव्हेंबर २०२२-२३ दरम्यान डाळींच्या निर्यातीत ९०.४९ टक्के वाढ झाली आहे. गव्हाच्या निर्यातीत २९.२९ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ १ हजार ५०८ दशलक्ष डॉलर्सपर्यंत नोंदवली गेली.