नवी दिल्ली : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला आणि पुरुषांचे दारू पिण्याचे प्रमाण जास्त आहे. हा दावा आमचा नसून २०१९-२१ या काळात केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे तसेच शहरापेक्षा ग्रामीण भागात दारूच्या प्रेमात वाढ झाल्याचेही सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
१५ आणि त्यावरील वयोगटातल्या १ टक्के महिला मद्यपान करत असून त्याच वयोगटातले १९ टक्के पुरुष मद्यपान करत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रमाण १.६ टक्के असून शहरी भागातल्या महिलांचे प्रमाण ०.६ टक्के आहे. तर ग्रामीण भागातले १९.९ टक्के पुरुष मद्यपान करत असून शहरी भागातले १६.५ टक्के पुरुष मद्यपान करतात.
मद्यपान करणा-या स्त्री व पुरुषांची सर्वाधिक संख्या अरुणाचल प्रदेशात आहे. तिथे ५३ टक्के पुरुष मद्यपान करत असून महिलांचं प्रमाण २४ टक्के आहे. केरळ, जम्मू काश्मीरमध्ये मद्यपानाचं प्रमाण सर्वात कमी म्हणजे ०.२ टक्के आहे.
आरोग्यापेक्षा दारूवर होतो तिप्पट खर्च
ग्रामीण भागात राहणा-या भारतीयांकडून आरोग्यापेक्षा दारूवर तिप्पट खर्च होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून आरोग्यावर दरमहा ५६ रुपये खर्च केले जातात. तर दारूवर सरासरी १४० रुपये आणि तंबाखूवर १९६ रुपये खर्च केले जातात.
औषधांवर नाममात्र खर्च
क्रोम डीएम या संस्थेने मागे देशातील १९ राज्यातील ५० हजार खेड्यांना भेट देऊन हा सर्वे केला. ग्रामीण कुटुंबांकडून दरमहा ५०० रुपये विविध खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधनांवर खर्च केले जातात. तसेच मासिक खर्चामधून औषधांवर जास्तीत जास्त १९६ रुपयांपर्यंतच खर्च होतात, असे या सर्वेत म्हटले आहे.
दारूबंदीपेक्षा जनजागृती महत्वाची
कोणत्याही गोष्टीला विरोध केला की त्याचे आकर्षण वाढते. दारूबंदी ठेवा किंवा उठवा यापेक्षा दारूबंदीचा एवढा बाऊ कशासाठी हे कळत नाही. दारू विक्री सुरू केली तर लोक कदाचित कमी प्रमाणात पितील. कारण त्याचे आकर्षण कमी होईल. शिवाय नकली दारूलाही आळा बसेल. वास्तविक निव्वळ बंदी लादल्याने लोक दारू पिणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.