मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्को येथे शांघाय को-ऑपरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि चीनच्याशिष्टमंडळांची एक बैठक झाली. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. ही बैठक २ तास २० मिनिटे सुरू होती. बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यावर चर्चा झाली.
ही परिस्थिती चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे; यावर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांचे एकमत झाले. यानंतर चर्चा झाली. चर्चेत दोन्ही देशांनी आपापली भूमिका स्पष्ट केली. तणाव चीनच्या सैन्यामुळे वाढला आहे, अशा परिस्थितीत चिनी सैन्याने छावण्यांमध्ये जाऊन तणावापूर्वीची स्थिती निर्माण करावी. यातून तणाव दूर होईल आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण होईल; अशी भूमिका भारतीय शिष्टमंडळाने मांडली.
उंच डोंगरांवर भारताने मोर्चेबांधणी केली आहे. ही मोर्चेबांधणी भारताच्या हद्दीत आणि भारताच्या सुरक्षेसाठी असल्यामुळे या व्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही, असे भारत ठामपणे म्हणाला. चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मान राखावा असे भारताने ठणकावून सांगितले. नियंत्रण रेषेच्या उल्लंघनाचे प्रकार चिनी सैन्याकडून झाले नाही तर तणाव कमी होण्यास मदत होईल, असेही भारताने सांगितले.
The meeting between Defence Minister Rajnath Singh and Chinese Defence Minister, General Wei Fenghe in Moscow is over. The meeting lasted for 2 hours and 20 minutes: Office of the Defence Minister https://t.co/Rz6uQYqN9i
— ANI (@ANI) September 4, 2020
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत राहायचे आणि चर्चा सुरू ठेवायची हा प्रकार भारत खपवून घेणार नसल्याचे चीनला स्पष्ट करण्यात आले. भारत-चीन यांच्यात १९६२ मध्ये झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारत अतिशय सक्षम अशा स्थितीत लडाखमध्ये मातृभूमीचे रक्षण करत आहे. या भक्कम स्थितीमुळे आलेला आत्मविश्वास भारतीय शिष्टमंडळाच्या बोलण्यातून जाणवत होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हातवारे करुन आपले मुद्दे मांडत असतानाचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या फोटोंमधून संरक्षणमंत्र्यांनी आक्रमकपणे भारताची बाजू मांडल्याचे दिसत आहे.
याआधी शांघाय को-ऑपरेशनच्या बैठकीत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचा उल्लेख न करता एक वक्तव्य केले. ‘क्षेत्रीय स्थैर्य आणि शांततेसाठी आक्रमकता चांगली नाही;’ असे ते म्हणाले. हे वक्तव्य चीनला उद्देशून करण्यात आल्याचे उपस्थितांच्या लगेच लक्षात आले.
याआधी चीनने भारताशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. राजनाथ यांच्या दौऱ्यात भारत-चीन चर्चेचा कार्यक्रम आधी ठरला नव्हता. त्यामुळे चीनला चर्चेसाठी वेळ देण्याचा निर्णय बऱ्याच वेळाने झाला. अखेर शुक्रवारी रात्री दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी चर्चा करावी असे ठरले आणि चर्चा पार पडली.
चर्चा झाली तरी भारताने सावधगिरीचा पवित्रा कायम ठेवला आहे. लष्करप्रमुख नरवणे आणि हवाईदल प्रमुख भदौरिया आपापल्या दलांच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत तर हवाईदल प्रमुख उत्तर भारतातील हवाई दलाच्या निवडक विमानतळांना भेट देऊन तयारीचा आढावा घेत आहेत. दोन्ही प्रमुख आपल्या दौऱ्याचा अहवाल दिल्लीत परतल्यावर संरक्षणमंत्र्यांना सादर करणार आहेत. ही प्रक्रिया सुरू असतानाच सैन्याने चिनी हालचालींवरचे लक्ष तसूभरही हटू दिलेले नाही. चीनने आगळीक केल्यास चिनी सैन्याला रोखण्याच्या स्पष्ट सूचना सैनिकांना देण्यात आल्या आहेत. लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या ठरल्याप्रमाणे चर्चा सुरू आहेत. या चर्चांतून अद्याप तोडगा निघालेला नाही.
जग कोरोना संकटाचा मुकाबला करत असताना चीनला विस्तारवादाच्या खुमखुमीने पछाडले आहे. आपल्या सर्व शेजारी देशांचे जमतील तेवढे भूभाग बळकावण्याचा तसेच दक्षिण चीन समुद्रात दादागिरी करण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ युद्धसदृश स्थितीसाठी सैनिकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करुन तसेच वारंवार भारतात घुसखोरीचा प्रयत्न करुन चीनने मे महिन्यापासूनच तणाव वाढवला.
जून महिन्यात गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैनिकांनी प्राणार्पण केले. एका प्राणघातक संघर्षात भारताच्या एका कर्नलसह २० सैनिकांनी हौतात्म्य पत्करले होते. भारतीय वीरांनी प्राणघातक संघर्षात चीनचे ३५पेक्षा जास्त सैनिक ठार केले तसेच अनेक चिनी सैनिकांना जखमी केले. चीनने गलवान खोऱ्यातील घुसखोरीचा प्रयत्न सोडून देत माघार घेतली. या नंतर भारताने स्वतःच्या हानीचे आकडे जाहीर केले. मात्र चीनने स्वतःच्या हानीचे अधिकृत आकडे अद्याप जाहीर केलेले नाही. चिनी हानीबाबत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी उपग्रहांच्या फोटोआधारे अंदाज जाहीर केला होता. या घटनेनंतर अडीच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत-चीन आमनेसामने दिसत आहेत.
चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्ट दरम्यान पँगाँग त्सो लेक (पँगाँग सो लेक किंवा पँगाँग लेक) परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून लडाखमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनचा हा प्रयत्न भारताने हाणून पाडला. भारतीय सैन्याने प्रचंड वेगाने पँगाँग लेक भोवतालच्या सर्व उंच डोंगरांवर मजबूत मोर्चेबांधणी करुन चिनी सैन्याला हुसकावून लावले. एवढा मार खाऊनही चीनचे मागील चार-पाच दिवसांपासून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारताच्या भक्कम स्थितीमुळे दररोज चिनी सैन्याला माघार घ्यावी लागत आहे. चिनी सैन्याच्या या उद्योगामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावात वाढ झाली आहे.
‘सीएस’कडे ११ हजार तर मनपाकडे १५ हजार अँन्टीजन टेस्ट किट उपलब्ध