26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाशरीरसौष्ठवात भारतच बाहुबली; यतिंदर सिंग 'आशिया श्री-चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'

शरीरसौष्ठवात भारतच बाहुबली; यतिंदर सिंग ‘आशिया श्री-चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

एकमत ऑनलाईन

माफुशी (मालदीव) : आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेवर भारतानेच वर्चस्व गाजवले. भारताच्या यतिंदर सिंगने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात चार वर्षांनी कमबॅक करताना आपल्याच देशातील अनुज कुमार तालियान, आर. कार्तिकेश्वर, एम. सर्वानन यांच्यासारख्या दिग्गजांवर मात करून आशिया श्रीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. यतिंदरबरोबर भारतानेही आज सात पैकी सहा सुवर्ण जिंकून आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात भारतच बाहुबली असल्याचे जगाला दाखवून दिले. भारताने शरीरसौष्ठव इतिहासातील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना १३ सुवर्ण पदकांसह विक्रमी ३८ पदके जिंकली. यात १६ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेतील पहिले सुवर्ण भारताने जिंकून दमदार सुरूवात केली होती तर आज स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावून शेवटही गोड आणि संस्मरणीय केला. स्पर्धेचा चौथा दिवस भारताचाच होता. स्पर्धेतील सर्वोत्तम आणि संस्मरणीय कामगिरी भारताने आजच केली. आज एकंदर मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे सात गट खेळविले गेले. त्यापैकी सहा गटात भारतीयांनी बाजी मारली. केवळ ७५ किलो वजनी गटात इराणचा अली इस्माइलझादेह विजेता ठरला.

जन गण मनचे नॉनस्टॉप सूर
दिवसाचे पहिले सुवर्ण ७० किलो वजनी गटात हरीबाबूने पटकावले. ७५ किलोमध्ये इराणी विजेता ठरला. मात्र त्यानंतर झालेल्या पाचही गटात केवळ जन गण मनचेच सूर कानी पडले. आपल्या खेळाडूच्या नावाची घोषणा होताच सभागृहात भारतमाता की जयचा आवाज घुमू लागला. ८० किलोत अश्विन शेट्टी सर्वात्तम ठरला तर ८५ किलोमध्ये यतिंदरने थायलंडच्या अपिचाय वांडीवर मात केली. ९० किलोमध्ये एम. सर्वानन आपल्याच संजोय साहाला मागे टाकून विजेता ठरला. १०० किलोच्या गटात कार्तिकेश्वरने उझबेकिस्तानच्या आंद्रेय फेडोरोव्हचे आव्हान मोडीत काढले तर १०० किलोवरील गटात चारही खेळाडू भारतीय असल्यामुळे यात अनुज कुमार तालियान विजेता ठरला.

अशाप्रकारे सलग पाच गटात जन गण मनचे सूर ऐकायला मिळाल्यानंतर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत भारताचाच खेळाडू बाजी मारणार हे स्पष्ट होते. यात यतिंदरने अनुज आणि कार्तिकेश्वरचे कडवे आव्हान परतावून लावत आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. आशिया श्री जिंकायचीच, हे माझे स्वप्न होते आणि ते मी साकार केलेय. आता पुढचे ध्येय मि. वर्ल्ड आहे. तेसुद्धा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचेच, असे उद्गार अजिंक्यपदानंतर यतिंदरने काढले. विजेत्याला जागतिक संघटनेचे अध्यक्ष दातुक पॉल चुआ, सरचिटणीस चेतन पाठारे आणि मालदीवचे क्रीडा मंत्री अहमद महलुफ यांच्या हस्ते आशिया श्रीचा करंडक आणि सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.

भारतालाच सांघिक विजेतेपद
मालदीव गाजवले ते भारतीय खेळाडूंनी. पहिल्या स्पर्धेपासून शेवटच्या स्पर्धेपर्यंत भारताच्या खेळाडूंनी आपली ताकद जगाला दाखवली. या स्पर्धेत सर्वात मोठा ८१ खेळाडूंचा संघ भारताचाच होता आणि त्यापैकी ३८ खेळाडूंनी पदके जिंकली, ही सर्वात मोठी अभिमानाची बाब आहे. १३ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कांस्य जिंकत भारताने १३३० गुणांसह सांघिक विजेतेपदही काबीज केले. ७६० गुणांसह थायलंड सांघिक उपविजेता ठरला तर इराणने तिसरे स्थान मिळविले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या