20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeक्रीडाभारताची मालिकेत १.० आघाडी

भारताची मालिकेत १.० आघाडी

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : गुवाहाटी येथे पार पडलेल्या भारतविरुद्ध श्रीलंकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला ६७ धावांनी मात देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आधी फलंदाजी करत भारताने श्रीलंकेसमोर ३७४ धावांचे लक्ष्य श्रीलंका संघासमोर ठेवले. पण ५० षटकांत श्रीलंकेचा संघ ८ गडी गमावून ३०६ धावाच करू शकला. त्यामुळे भारत ६७ धावांनी विजयी झाला. विशेष म्हणजे यावेळी श्रीलंकन कर्णधार दासून शनाकाने नाबाद १०८ धावा ठोकत एक कडवी झुंज दिली. मात्र, संघाला विजयी करण्यात तो यशस्वी ठरू शकला नाही.

सामन्यात सर्वप्रथम श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने चांगली सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्माने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकार ठोकत ६७ चेंडूत ८३ धावा केल्या, तर शुभमन गिलने ६० चेंडूत ७० धावांचे योगदान दिले. गिलने आपल्या खेळीत ११ चौकार लगावले. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुलने २९ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. पण यासर्वांपेक्षा सर्वाधिक धावा करत दमदार असे शतक लगावले ते किंग कोहलीने. विराटने १२ चौकार आणि १ षटकार ठोकत ११३ धावा केल्या. मात्र, याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्यासारख्या फलंदाजांनी निराशा केली. श्रेयस अय्यरने २४ चेंडूत २८ धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने १२ चेंडूत १४ धावा केल्या. अखेरच्या क्षणी भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याने धावगती मंदावली. त्यामुळे ४०० धावांचा टप्पा ओलांडण्याचे भारतीय फलंदाजांचे स्वप्न भंगले.

दरम्यान, ३७४ धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाचे बरेच फलंदाज अपयशी ठरले. पाथुम निसांकाचे ७२ तर धनंजया डिसिल्वाच्या ४७ धावांनी संघाला तारले. पण या सर्वाशिवाय अखेरपर्यंत झुंज दिली ती कर्णधार दासून शनाका याने. दासूनने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकत नाबाद १०८ धावा केल्या. पण अखेर षटके कमी पडल्याने श्रीलंकेचा संघ ५० षटकांत ८ गडी गमावून ३०६ धावाच करू शकला. त्यामुळे भारत ६७ धावांनी विजयी झाला. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या