चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने २६९ धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिस-या एकदिवसीय सामन्यातही फलंदाजी क्षीण झाली आणि ४९.१ षटकात २४८ धावांवर सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियाने तिसरी वनडे २१ धावांनी जिंकून मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यापूर्वी टीम इंडिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र तिसरी वनडे हरल्याने भारत दुस-या क्रमांकावर गेला आहे.
ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकल्यानंतर दोन्ही संघांचे ११३ गुण झाले असले तरी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा पुढे आहे. त्याचवेळी ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंड तिस-या क्रमांकावर आणि इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी नक्कीच केली, पण एकदा का विकेट पडायला लागल्या मग त्यानंतर परिस्थिती बिकट झाली. रोहित शर्मा ३० आणि गिल ३७ धावा करून बाद झाला. केएल राहुलने विराट कोहलीसह डाव सांभाळला. पण ३२ धावांवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. यानंतर अर्धशतक झळकावून कोहली अॅश्टन एगरचा बळी ठरला आणि सूर्यकुमार यादवने पुन्हा १ चेंडूत आपली विकेट गमावली. अॅडम जंपाने १० षटकात ४५ धावा देत ४ बळी घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले.
सलामीवीर मिचेल मार्शने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाला चांगली सुरुवात करून दिली. ट्रॅव्हिस हेडसह त्याने ६८ धावांची भर घातली आणि संघ मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते. येथे टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यात ट्विस्ट आणला आणि एकापाठोपाठ तीन विकेट घेतल्या. त्याने ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ आणि नंतर मिचेल मार्शला गोलंदाजी करून भारताला पुनरागमन केले. येथून गडगडलेल्या संघाला २६९ धावांपर्यंत मजल मारता आली. खालच्या क्रमवारीत शॉन अॅबॉटने २६ आणि अॅश्टन अगरने १७ धावा जोडल्या.
भारतीय संघाकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने ३-३ बळी घेतले. शानदार गोलंदाजी करताना हार्दिकने ८ षटकात ४४ धावा देत या तीन विकेट घेतल्या. कुलदीपने १० षटकात ५६ धावा देत ३ बळी घेतले. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी २-२ असे यश मिळवले.