कोरोना रुग्णांच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर

    364

    नवी दिल्ली: वृत्तसंस्था
    भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेले नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकले असून, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६ हजार ९७७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

    भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ८४५ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या चार हजारावर पोहोचली आहे. यामुळे अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता १० व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे. भारतात सध्या ७५ हजार ७०० कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्सनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात सध्या कोरोनाचे एकूण २८ लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, एकट्या अमेरिकेत ही संख्या ११ लाख आहे.

    देशात महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून, ३०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकट्या मुंबईत १७२५ नवे रुग्ण मिळाले आहेत. यासोबत राज्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे. तामिळनाडूत ७६५ नवे रुग्ण सापडले असून, रुग्णसंख्या १६ हजार २७७ झाली आहे. आठ रुग्णांच्या मृत्यूसोबत मृतांची संख्या ११२ झाली आहे.

    वादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालने आतापर्यंतचे सर्वाधिक २०८ रुग्ण आढळले आहेत. यासोबत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ६७७ झाली असून २७२ मृतांची नोंद झाली आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये गुजरातचाही क्रमांक असून ३९४ नवे रुग्ण आढळले असून, रुग्णसंख्या १४ हजार ६३ वर पोहोचली असून, मृतांच्या संख्या ८५८ झाली आहे.

    Read More  धक्कादायक खुलासा : दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2000 मुंबई टेस्ट, कोचीन वनडे सामने फिक्स

    सर्वाधिक पीपीई कीट बनवणा-या देशांच्या यादीत दुस-या स्थानी
    एक मार्च, कोरोनाचा देशात उद्रेक होण्यापूर्वी भारतात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट बनवणारी एकही फॅक्टरी नव्हती. पण, १८ मे पर्यंत तब्बल ४.५ लाख पीपीई किट्स प्रतिदिन तयार केले जाऊ लागले. गुंतवणूक सुविधांसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या इनव्हेस्ट इंडिया या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका माहितीपुस्तिकेत ही माहिती दिली आहे.

    संदर्भासाठी ३० मार्च ही तारीख घेतल्यास या दिवशी भारतात प्रतिदिन ८ हजार पीपीई किट तयार केले जात होते. त्यानंतर हा अकडा वाढतच गेला. त्यामुळे पीपीई किट बनवणारे हे क्षेत्रचं आता ७ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेली बाजारपेठ बनली आहे. भारतात या क्षेत्राने केवळ ६० दिवसातचं ५६ पटींनी वाढ नोंदवली आहे.

    पीपीई किटमध्ये मास्क (एन ९५), ग्लोव्ह्ज (सर्जिकल आणि तपासणी), कोव्हराल्स (चेन असलेला पूर्ण लांबीचा बाहेरील कोट) आणि गाऊन, हेड कव्हर, गॉगल, फेस शिल्ड आणि शू कव्हर या गोष्टींचा समावेश असतो. आजच्या घडीला भारतात ६०० पेक्षा अधिक कंपन्यांना पीपीई किट तयार करण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे़ या क्षेत्राची जागतिक बाजारपेठ सन २०२५ पर्यंत सुमारे ९२.५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त झालेली असेल. जी सन २०१९ मध्ये ५२.७ बिलियन डॉलर इतकी होती.

    चीन सध्या सर्वाधिक पीपीई किट बनवणे आणि त्याची निर्यात करण्यामध्ये जगाचे नेतृत्व करीत आहे. भारतीय पीपीई किट उत्पादकांसाठी अमेरिका आणि आशिया खंडातील देश ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या दोन रिजनमध्ये पीपीई किटच्या बाजाराचा एकत्रितपणे ६१ टक्के हिस्सा आहे. यामध्ये युरोप ही अतिरिक्त २२ टक्के हिस्सा असलेली बाजारपेठ आहे.

    सध्या भारतीय पीपीई किट्स बनवणाºया कंपन्यांना परदेशात निर्यातीवर बंदी आहे. कारण या पीपीई किट्सची खरी गरज देशात कोरोनाविरोधात फ्रंटलाइनवर लढणा-या आरोग्य कर्मचा-यांना आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अ‍ॅपरल एक्पोर्ट प्रमोशन काउन्सिलने आपल्या वेबिनारमध्ये म्हटले होते की, देशातील पीपीई किट्सची मागणी पूर्ण करण्यात स्थानिक कंपन्या यशस्वी झाल्या की, यावरील निर्यातबंदी लवकरच उठवण्यात येईल.

    पीपीई किट बनवण्याचे बंगळूरु देशातील सर्वात मोठे हब
    भारतात सध्या मागणीनुसार १५.९६ लाख पीपीई किट्स तयार आहेत तसेच आणखी २.२२ कोटी किट्स तयार केले जात आहेत. यामध्ये कर्नाटकची राजधानी बंगळूरु शहर हे पीपीई किट बनवण्याचे देशातील सर्वात मोठे हब बनले आहे. या एकट्या शहरात ५० टक्के पीपीई किट्स तयार केले जात आहेत. पीपीई किट बनवणाºया इतर केंद्रांमध्ये तिरुपूर, कोईम्बतूर, चेन्नई, अहमदाबाद, वडोदरा, लुधियाना, भिवंडी, कोलकाता, नोयडा आणि गुरगाव या शहरांचा समावेश आहे.

    इंडिया इन्व्हेस्ट पेपरच्या माहितीनुसार, सन २००२ ते २००४ मध्ये आलेल्या सार्सच्या साथीनंतर भारत आता पीपीई किटच्या वाढत चाललेल्या बाजारपेठेचं लक्ष वेधून घेत आहे. आत्तापर्यंत सिंगापूरकडे पुरेशा डिस्पोजेबल पीपीई किट्सचा साठा उपलब्ध होता. त्याचा उपयोग सध्याच्या कोरोनाच्या साथीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला.