कोरोना विषाणू संसर्गाच्या वैश्विक संकटामुळे मृत्यूच्या भयापोटी मानवजात बंदिस्त झाली. मानवनिर्मित यंत्रही लॉकडाऊन झाले. मानवी विकासाच्या इतिहासात प्रथम संपूर्ण जगातील मानव एकाच वेळेस बंदिस्त होण्याची ही ऐतिहासिक घटना आहे. मानवाने आपल्या सुखासाठी निर्माण केलेले यंत्र-शस्त्र म्यान केले. पृथ्वीतलावर मनुष्यांचे राज्य आहे अशा अविभार्वात वावरणा-या मनुष्यप्राण्यांच्या संचारावरील प्रतिबंधाने पृथ्वीवरील लाखो जीवसृष्टीवर व पर्यावरणावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. लॉकडाऊन कधी संपणार? त्यानंतर जगाचे चित्र कसे असेल हा आता येथे विषय नाही, पण मनुष्यप्राण्याच्या हट्टापायी, सुखासाठी त्यांनी या पृथ्वीतलावरील जीवसृष्टीला ओरबाडून खाल्ले. त्या मनुष्यप्राण्याला काही काळ बंदिवासात ठेवल्याने पृथ्वीतलावरील लाखो जिवांची जगण्याची आशा पल्लवित झाली आहे. कोरोनानंतर जग कसे असेल त्यापेक्षा मनुष्याने आपल्या जीवन पद्धतीत आमूलाग्र परिवर्तन न घडवल्यास मानवी समूहासह सृष्टीच्या अस्तित्वास धोका निर्माण होईल.
१९९० च्या दशकात तापमानवाढीने जगावर होणाºया दुष्परिणामावर जगभरात तज्ज्ञांची चर्चा घडून आणली. प्रोसेसिंग आॅफ नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेस पियर रियुज या संस्थेने यासंदर्भात दिलेल्या अहवालात हवामान बदलामुळे संभाव्य धोक्याची भीषणता दर्शविली आहे. अलीकडील दशकात विकासाच्या नावावर चाललेल्या वन्यजिवांचे उच्चाटन म्हणजे पृथ्वीच्या इतिहासातील सहावे नामशेष होण्याचे क्रूर कर्म चालू आहे आणि पूर्वीपेक्षा ते अधिक भीषण आहे. वन्यजिवांची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल हा मानवाने स्वत:च्या पायावर टाकलेला धोंडा असून ही कृती सृष्टीचा नाश ओढवणारी आहे. जगभरातील संशोधक व संस्थांनी यासंदर्भात धोक्याचा इशारा दिला तर जागतिक पातळीवर या विषयावर गांभीर्याने चिंतन सुरू झाले.
Read More सोलापुरात कोरोनाचा वाढता उद्रेक
कोरोना निमित्त: ग्लोबल वॉर्मिंगला ब्रेक!
कोरोना संसर्गाच्या निमित्ताने जागतिक टाळेबंदी व मानवी संचारास असलेल्या प्रतिबंधाने जगातील प्रदूषण ७१ – ८० टक्के कमी झाले आहे. कोरोना व्हायरस हा ग्लोबल वॉर्मिंग संकटासाठी एक देवदूत ठरत आहे.पृथ्वी दिनानिमित्त लॉकडाऊनचे सकारात्मक परिणामाचे वृत्त झळकले. सर्वाधिक प्रदूषित शहरांची हवा शुद्ध व स्वच्छ झाली. औद्योगिक शहरालगतच्या नद्या व समुद्रकिनारे ब-याच प्रमाणात शुद्ध झाले. आपल्या भारताच्या बाबतीत उदाहरण द्यावयाचे झाले तर गेल्या चार-पाच दशकांपासून गंगा या नदीच्या प्रदूषणाचा विषय चिंतनीय, राजकीय व धार्मिक अस्मितेचा झाला होता. गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी आजपर्यंत सुमारे ४० ते ५० हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. पण गंगेचा एक थेंबही शुद्ध झाला नाही़ गंगा नदी मृत्युशय्येवर उभी होती. परंतु लॉकडाऊनच्या कालखंडात गंगा नदीच्या आॅक्सिजनच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. व हरिद्वार येथील गंगेचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल जल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. टाळेबंदीच्या कार्यकाळात वन्य प्राण्यांनी मोकळा श्वास घेतला. पुराणाच्या काळात उल्लेख असणारा दुर्मिळ तक्षक सापाचे दर्शन घडले. प्राणी-पक्षी यांच्या मुक्त संचाराने निसर्गप्रेमीही मोहित झाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे निळे आकाश, आकाशातील चांदणे व मोरांचा मुक्त संचार हे आपण तीस-चाळीस वर्षांनंतर प्रथमच अनुभवतो हे लॉकडाऊनच्या सकारात्मक परिणामाचे बोलके भाष्य आहे. अमेरिकेच्या समुद्रकिनाºयावर लुप्त झालेल्या व्हेल माशाचा मुक्त संचार या काळात पाहण्यास मिळाला .
Read More धक्कादायक : पत्नी, मुलगा आणि मुलीवर गोळ्या झाडून सीआरपीएफ जवानाने केली आत्महत्या
प्राणहानी व वित्तहानीत लक्षणीय घट
प्रदूषणामुळे होणाºया आजारामुळे भारतात दरवर्षी साधारणत: १२ लाख लोक मृत्युमुखी पडतात. टाळेबंदीमुळे मनुष्याच्या संचारावर प्रतिबंध आल्याने हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण वाढले त्यामुळे मानवी आरोग्यात सुधारणा झाली. संसर्ग आजार, रक्तदाब इतर आजारांचे प्रमाण या काळात घटले. किमान एक लाख लोकांचे प्राण वाचले. रस्ते अपघातात भारतात दर मिनिटाला एक मृत्यू होतो. लॉकडाऊन काळात अपघातांचे प्रमाण ९० ते ९५ टक्के कमी झाले. त्यामुळे १२००० पेक्षा अधिक लोकांचे प्राण या कालावधीत वाचले. इतर आजारांचे प्रमाणही घटले व अपघात नगण्य झाल्याने उपचारासाठी खर्च होणारे हजारो कोटी रुपये वाचले. वाहनांची रेलचेल थांबल्याने अनावश्यक इंधनाची उधळपट्टी थांबली त्यामुळे हजारो कोटी रुपयांचे परदेशी चलन वाचले. समाजातील व्यसनाधीनता कमी झाली त्यातूनही पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली.
भगवान महावीर व महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज
सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान महावीरांनी मानवाची सत्ता, संपत्ती लालसा व विलासी जीवन पद्धतीने निसर्गाची हानी होऊन संपूर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी राजसत्तेचा त्याग करून भारतीय समाजाला निसर्गपूरक जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. भगवान महावीरांच्या ५ तत्त्वांमध्ये अहिंसा हे तत्त्व अतिमहत्त्वाचे आहे. मनुष्याला नव्हे तर पृथ्वीवरील सर्व सूक्ष्म जीव, प्राणी, वनस्पती यांना जगण्याचा अधिकार आहे. सृष्टीतील इतर जीव जगले तर मनुष्य जगेल. मनुष्याला बुद्धी असल्याने तो या सृष्टीचा विश्वस्त आहे. मनुष्याचे वर्तन हे विश्वस्ताप्रमाणे असावे असे महान तत्त्वज्ञान भगवान महावीर यांनी मांडले. आधुनिक भारताच्या इतिहासात महात्मा गांधींनीही यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून निसर्गाच्या शोषणाचे भविष्यात होणारे दुष्परिणाम ओळखले होते. प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबनाचा व मर्यादित गरजांचा कानमंत्र दिला. पारंपरिक कृषी संस्कृतीचा पुरस्कार करून ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला. भगवान महावीरांच्या अहिंसा या अस्त्राचा वापर करून साम्राज्याचा सूर्य न मावळणाºया इंग्रजी गुलामगिरीतून भारतीयांना मुक्त केले. आज कोरोना या वैश्विक संकटानंतर निर्माण होऊ पाहत असलेल्या नव्या जागतिक व्यवस्थेत भगवान महावीरांच्या व महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या जीवनपद्धतीला महत्त्व प्राप्त होणार आहे. इतिहासात आपण आपल्या महान संस्कृती व जीवन पद्धतीला ढोंगी, धार्मिक, जातीय व अंधश्रद्धेत जखडून ठेवले. परिणामी प्राचीन भारतीय जीवन पद्धती अडगळीत पडली. आज भगवान महावीरांच्या शौर्याप्रमाणे समाजातील श्रीमंत वर्गाने त्यागाची भूमिका घ्यावी. सत्ताधारी राजकीय नेत्यांनी महात्मा गांधींप्रमाणे फकिरी वृत्तीचा अंगीकार करून निरपेक्ष पद्धतीने सत्तेचा वापर मानव व पर्यावरण यांच्या रक्षणासाठी केल्यास कोरोनानंतरच नव्या जगाचे, नेतृत्व निश्चितच भारताकडे असेल.
– संजय टाकळगव्हाणकर