नीती घंसास, स्वीटी बुराची सुवर्ण कामगिरी, आणखी २ पदकांवर नजर
नवी दिल्ली : वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास आणि स्वीटी बुरा यांनी सुवर्ण पदक पटकावले. सर्वप्रथम नीतू घंसास हिने, तर त्यानंतर स्वीटी बुराने सुवर्णपदक पटकावत भारताला दोन सुवर्ण पदके मिळवून दिली.
भारताच्या नीतू घंसासने ४८ किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंग हिचा पराभव करत गोल्ड पदकावर नाव कोरले. तिने अलतेंगसेंग हिचा ५-० ने दारुण पराभव केला. याआधी शनिवारी नीतू घंघास हिने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. दिल्ली येथे सुरु असलेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्स्ािंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर स्वीटी बुरा हिने ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. भारतासाठी तिने या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले. तिने ७५-८१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या बॉक्सरचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. इथपर्यंत पोहोचण्यात त्यांचे पती दीपक हुड्डाचे योगदान मोठे आहे.
कबड्डीपटू दीपक हुड्डासोबत स्वीटीने लग्न केले आहे. एक खेळाडू असल्याने दीपकला प्रशिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहिती आहे. याच कारणामुळे त्यांनी स्वीटीला सराव करण्यापासून कधीच थांबवले नाही. गरज असेल तेव्हा नेहमीच साथ दिली आणि आता स्वीटीने देशाचा गौरव वाढविला. स्वीटीने दीपकशी लग्न केले आणि लग्नाच्या १० दिवसांनंतर ती प्रॅक्टिसमध्ये गुंतली. त्यामुळे ती आज सुवर्ण पदकाची कामगिरी करू शकली.
याशिवाय भारताला आणखी २ महिला बॉक्सरकडून सुवर्णपदाची अपेक्षा आहे. निखत जरीन आणि लवलिना बोरहेगन या बॉक्सरचा समावेश आहे. या दोघींचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यांकडेही भारतीयांचे लक्ष असेल. या दोघीही आघाडीच्या भारतीय बॉक्सर असून, त्यांच्याकडूनही सुवर्ण पदकांची अपेक्षा आहे. त्यामुळे भारताला एकूण ४ सुवर्ण पदके मिळू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.