लंडन : भारताने इंग्लंडचा पहिल्या वनडे सामन्यात १० विकेट राखून पराभव करीत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने नाबाद ७६ तर शिखर धवनने नाबाद ३१ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने १९ धावांत ६ तर मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या.
इंग्लंडने ठेवलेल्या १११ धावांचा पाठलाग करताना भारताची सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्माने सवाध सुरूवात केली. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने सेट झाल्यानंतर आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. दुस-या बाजूने शिखरने त्याला सावध साथ दिली.
रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले. या जोडीने नाबाद शतकी भागीदारी रचली. त्यातील ६० टक्क्यांपेक्षाही जास्त वाटा रोहितने उचलला. अखेर या दोघांनी इंग्लंडचे १११ धावांचे आव्हान १९ षटकांत पार करत भारताला नाबाद विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीला मोठे खिंडार पाडले. जसप्रीत बुमराहने १९ धावांत ६ तर मोहम्मद शमीने ३१ धावांत ३ बळी घेत इंग्लंडचा डाव ११० धावांवर संपुष्टात आणला.