जीनेव्हा : जगभरात कोरोनाच्या तिस-या लाटेचा कहर सध्या सुरू आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा इतका घातक नसला तरी तो खूप वेगाने पसरत असल्याचे आढळून आले आहे. या सगळ्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. आफ्रिकेत कोरोनाची चौथी लाट ओसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशातील कोरोना प्रसाराचा वेग कमी होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेली चौथी लाट गेल्या सहा आठवड्यांपासून अधिक तीव्र झाली होती. मात्र ती आता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ११ जानेवारीपर्यंत आफ्रिकेत १० दशलक्षाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. तर कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या एका आठवड्यात १४ टक्क्यांची घट झाली आहे. जिथे ओमिक्रॉनचे रुग्ण सर्वात आधी आढळले त्या दक्षिण आफ्रिकेतही दर आठवड्याला आढळणा-या रुग्णसंख्येत ९ टक्क्यांची घट झाली आहे. पूर्व आणि मध्य आफ्रिकी परिसरातही घट नोंदविण्यात आली आहे. मात्र उत्तर आणि पश्चिमी आफ्रिकेत मात्र अजूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. उत्तर आफ्रिकेतल्या रुग्ण संख्येत गेल्या आठवड्यात १२ ते २१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
वेग कमी होत असला तरीही अस्थिरता
आफ्रिकेचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मत्शिदिसो मोएती म्हणाले की, प्राथमिक संकेत असे सांगतात की देशातली चौथी लाट ही वेगवान असली तर ती आता कमी होत आहे. मात्र यात अस्थिरता दिसून येते. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी ज्या उपायांची गरज आहे, त्या उपायांचे अवलंब अजूनही केलाच पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यायला हवी.
आफ्रिकेत लसीकरण अत्यल्प
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयिसस यांनीही काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतल्या लसीकरणाविषयी चिंता व्यक्त केली होती. देशातल्या ८५ टक्क्यांहून अधिक लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.