महिलाबाद: वृत्तसंस्था
देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर आणि पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. अगदी सेलिब्रिटीजपासून ते नेत्यांपर्यंत आणि पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी या कोरोनायोद्ध्यांचे कौतुक केले आहे.
भारताचे मँगो मॅन म्हणून ओळखल्या जाणा-या हाजी कलीमुल्लाह खान यांनीही अगदी हटके पद्धतीने या कोवीड योद्ध्यांना सलाम केला आहे. आंब्याच्या वेगवेगळे वाण विकसित करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या खान यांनी नुकत्याच दोन नवीन वाण तयार केले आहे. हे दोन्ही वाण त्यांनी कोवीड योद्ध्यांना समर्पित करत एका वाणाचे नाव डॉक्टर आंबा तर दुस-याचे पोलिस आंबा असे ठेवले आहे. द बेटर इंडिया या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
Read More भारतात ‘ऍमेझॉन’ देणार ५०,००० लोकांना नोकरीची संधी
बागायत शेतीचे तज्ज्ञ असणा-या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये १६०० वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात. उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या २० एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी ८ एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात. त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर ३०० प्रकारच्या आंब्यांचे उत्पादन घेतले होते़ आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
कलीमुल्लाह हे त्यांच्या प्रयोगांबरोबर नवीन आंब्याचा वाण विकसित केला की खास काम करणाºया व्यक्तींचे नाव त्या वाणाला देण्यासाठी ओळखले जातात. सध्या कोरोनामुळे देशातील आंबा उत्पादकांना फटका बसला आहे. ऐन आंबा विक्रिच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या परिस्थितीमध्येही लोकांच्या सुरक्षेसाठी झटणा-या पोलिस आणि डॉक्टरांचे कौतुक करण्यासाठी कलीमुल्लाह यांनी दोन खास वाण निर्माण केले आहेत. या वाणांना त्यांनी पोलिस आंबा आणि डॉक्टर आंबा असे नाव ठेवले आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये पहिल्या फळीत काम करणाºया कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यासाठी मी दोन नवीन वाण बनवले आहेत. हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालणारे हे कोरोना योद्धे ख-या अर्थाने हिरो आहेत. कामाबद्दल असणारी त्यांची श्रद्धा आणि निस्वार्थ भाव खरोखच कौतुकास्पद आहे. त्यांचा गौरव करण्यासाठीच मी दोन वाण विकसित केले असून, या वाणांना त्यांचे नाव देणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे कलीमुल्लाह यांनी द बेटर इंडियाशी बोलताना सांगितले.
आपआपल्या क्षेत्रामध्ये अतुलनिय कामगिरी करणा-या व्यक्तींची नावे मी तयार केलेल्या नवीन वाणांना देत असतो. त्यांच्या कामांमुळे जगावर झालेल्या सकारात्मक परिणामांचे कौतुक करण्याची ही माझी पद्धत आहे. त्यांचे नाव आंब्यांना देऊन त्यांचा गौरव करण्याचा माझा हेतू असतो, असे कलीमुल्लाह यांनी स्पष्ट केले. १९८७ पासून कलीमुल्लाह हे काम करत आहेत.