मुंबई : भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयने रविवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय बॅडमिंटनपटूने रविवारी चुरशीच्या फायनलमध्ये चीनच्या वेंग हाँग येंगचा तीन गेममध्ये पराभव करून पहिले बीडब्लूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले. ३० वर्षीय प्रणॉयने ९४ मिनिटांच्या लढतीत जबरदस्त उत्साह दाखवत जागतिक क्रमवारीत ३४ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांगविरुद्ध २१-१९, १३-२१, २१-१८ असा विजय मिळवला. भारतासाठी पुरुष एकेरीत हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
प्रणॉयने गेल्या वर्षी थॉमस कपमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु २०१७ च्या यूएस ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डनंतर त्याने वैयक्तिक विजेतेपद ंिजकले नव्हते. केरळच्या या शटलरने गेल्या वर्षी स्विस ओपनची अंतिम फेरी गाठून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या जवळ पोहोचला होता. याशिवाय मलेशिया आणि इंडोनेशिया सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्यातही प्रणॉयला यश आले. रविवारी, जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने चीनच्या २३ वर्षीय खेळाडूविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली.