Tuesday, September 26, 2023

भारत-चीन तणाव वाढला!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सीमेवर उद्भवलेल्या तणावाच्या पृष्ठभूमिवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराला युध्दाच्या सज्जतेचे आदेश दिले असून, लडाखमध्ये अतिरिक्त कुमकही तैनात केली आहे़ चीनच्या या दादागिरीपुढे न झुकता लडाखमधून एक इंचही मागे हटणार नाही, असे भारताने चीनला ठणकावून सांगितले आहे़ यामुळे गेल्या काही दिवसांपासून सूरू असलेल्या तणावात आणखी भर पडली आहे.

भारताने सातत्याने स्थिरता आणि शांततेसाठी प्रयत्न केले असतानाही चीनच्या सैन्याकडून भारतीय पेट्रोलिंग पथकाला अडवण्यात आले. याशिवाय चीनकडून घुसखोरीचाही प्रयत्न केला जात आहे. पण भारत एक इंचही माग हटणार नाही आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहिल, अशी प्रतिक्रिया उच्चस्तरीय सरकारी सूत्रांनी दिली आहे.

भारत आपले हितसंबंध अत्यंत दृढपणे निभावणार आहे, योग्य ती संसाधने तैनात केली जातील आणि शांततेसाठी संवादातून काम केले जाईल. एलएसीवर भारतीय सैन्याकडून चीनची घुसखोरी ही रोखली जाईल, असेही सांगण्यात आले आहे़ कोरोना संकटामुळे ठप्प झालेले सीमेवर पायाभूत सुविधांचे कामही भारत लवकरच सुरू करणार आहे. पण लष्करी तणाव कमी करण्यासाठी चीनला वार्ता करण्याचे दरवाजे नेहमी खुले आहेत, असेही दुसºया एका सूत्राने सांगितले.

Read More  नारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राष्ट्रपती राजवटीची मागणी

पंतप्रधान मोदी यांनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट
चीनसोबत तणाव वाढला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत हजर होते. याआधी परराष्ट् सचिवांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक पार पडण्याआधी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना बैठकीची माहिती दिली.

चीनचेही स्पष्टीकरण
सीमेवर भारतासोबतची परिस्थिती एकंदरित स्थिर आणि नियंत्रणात असल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर चीनकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी वार्ताहरांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. भारत आणि चीनमध्ये संवाद आणि सल्लामसलतीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त साधने आहेत, असंही ते म्हणाले.

युद्धासाठी सज्ज राहण्याचे चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्यदलांना आदेश
कोरोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावर चीनची पुरती कोंडी झाली आहे. कोरोना संकटासाठी जगातील बहुतांश देश चीनला जबाबदार ठरवत आहेत. चहूबाजूंनी चीनवर दबाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करण्याचे व युद्धासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
देशाची स्थिरता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करा व युद्धासाठी तयार राहा, असे निर्देश जिनपिंग यांनी दिल्याचे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे.

चीनचा सध्या अमेरिका आणि भारताबरोबर वाद सुरु आहे. दोन्ही देशांबरोबर चीनचे संबंध ताणले गेले आहेत. सैन्यबळाचा वापर करुन तैवानचा जबरदस्तीने चीनमध्ये समावेश करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. त्याशिवाय चीन हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिकेने यावर खूप कठोर प्रतिक्रिया उमटू शकते, असा इशाराही चीनला दिला आहे.

चीनने सीमेवर कुमक वाढवली
चीनविरुद्ध १९६२ च्या युद्धात कळीचा मुद्दा ठरलेल्या गलवान नदी भागात चीन सैन्य तळ ठोकून आहे. स्थानिक स्तरावर झालेली चर्चा अपयशी ठरली आहे. आता सैन्य दिलेल्या आदेशांचे पालन करत असून नियंत्रण रेषेवर घुसखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चीनने सीमेवर सैन्याची कुमक मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. गेल्या काही आठवड्यात चीनने ५ हजारपेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत. यापैकी काही तुकड्या भारतीय हद्दीत असल्याचेही बोलले जाते़ दरम्यान, भारतीय सैन्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पण चीनने आपल्या बाजूने सैन्याची कुमक मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, वादग्रस्त जागेवर सध्या भारताचे जेवढे सैनिक आहेत, त्याच्या तीनपट सैनिक चीनने तैनात केले आहेत. मात्र सीमा संरक्षणासाठी भारताने पुरेसं सैन्य तैनात केले आहे़ मोठमोठी वाहने आणि आर्टिलरी तैनात केल्याचंही चीनच्या बाजूने दिसून येत आहे. हा एक नियमित संघर्ष नाही, तर चीनचं काही तरी मोठं नियोजन असल्याचा एक भाग आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चीनने सीमा भागात तैनात केलेले सैन्य मोठ्या प्रमाणात धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गलवान खोºयात आणले आहे़ पण चीनच्या मनात वेगळेच काही तरी शिजत आहे. पूल, रस्ते आणि इतर सुविधा तयार करुन या खोºयावर कायमचा कब्जा करण्याचे चीनचे मनसुबे असल्याचे बोलले जाते.

भारतासाठी गलवान नदीचे महत्त्व प्रचंड मोठे आहे. कारण ही नदी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या श्योक-दौलत बेक ओल्डी रस्त्याला लागून आहे. गेल्या वर्षीच हा रस्ता पूर्ण झाला होता. गलवान खोरÞ्यात चीन सैन्याची उपस्थिती ही या रस्त्यासाठी धोका आहे. कारण, भारतीय सैन्याची वाहतूक उत्तर भाग आणि काराकोरममध्ये करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. दरम्यान, भारतीय सीमेवरही सैन्याची कुमक सातत्याने वाढवली जात आहे. निगराणी ठेवण्यासोबतच सैन्याला आदेशही देण्यात आले आहेत. चीन सैन्याला पिटाळून लावण्यासाठी बळाचा वापर करू नये, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या