जकार्ता : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिले चार संघ हे विश्वचषकासाठी पात्र ठरणार होते. भारताने पाकिस्तानला मागे सारून अव्वल चारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या. भारताच्या नवोदित हॉकीपटूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर आशिया कप हॉकी स्पर्धेत इंडोनेशियाचा धुव्वा उडवून अव्वल चार संघांत स्थान मिळवले.
पाकिस्तानला मागे टाकून अव्वल चार संघांत प्रवेश करण्यासाठी भारताला इंडोनेशियाविरुद्ध १५-० अशा विजयाची गरज होती. भारताने गुरुवारी इंडोनेशियावर १६-० विजय मिळवला. त्यात पाकिस्तानला जपानकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘अ’ गटात दुसरे स्थान मिळवून भारताने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला, तर पाकिस्तानला गटातूनच बाहेर पडावे लागले. त्याचबरोबर अव्वल चारमध्ये राहून भारताने वर्ल्ड कपमधील प्रवेशही निश्चित केला. पाकिस्तानचे जपानविरुद्धच्या सामन्यातील दोन गोल व्हिडिओ रेफरलने नाकारले. त्यामुळे त्यांना २-३ असा पराभव पत्करावा लागला.
भारताने १५-० विजय मिळवला असता तर भारत आणि पाकिस्तानचा गोलफरक समान १२-० झाला असता. मात्र भारताने जास्त गोल केल्यामुळे (१८-१६) आगेकूच केली असती. मात्र, भारताने १६-० असा विजय मिळवला. त्यामुळे भारताचा गोलफरक १३ झाला, तर पाकिस्तानचा १२ भारताने पाकला मागे टाकत आगेकूच केली.
खरे तर भारतास लक्ष्य साधता येणार का, याची चिंता होती. पाकिस्तान तसेच जपानविरुद्ध गोलच्या संधी दवडल्या होत्या. त्यातच इंडोनेशियाविरुद्ध पहिल्या आणि दुस-या सत्रात प्रत्येकी तीन गोल केल्यामुळे अखेरच्या दोन सत्रात किमान नऊ गोलचे आव्हान होते. सुरुवातीच्या सत्रात पेनल्टी कॉर्नर दवडले जात असल्यामुळे संघावरील दडपण वाढत होते. तिस-या सत्रात चारच गोल झाले, पण अखेरच्या सत्रात सहा गोल करीत भारतीयांनी मोहीम फत्ते केली.
तुलनात्मक कामगिरी
भारत वि. पाकिस्तान
भारताचे निकाल
वि. पाकिस्तान १-१
वि. जपान २-५
वि. इंडोनेशिया १६-०
पाकिस्तानचे निकाल
वि. भारत १-१
वि. इंडोनेशिया १३-०
वि. जपान २-३