28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयऐन सणासुदीत महागाईच्या तीव्र झळा!

ऐन सणासुदीत महागाईच्या तीव्र झळा!

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकीकडे बाजारात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. ऐन सणोत्सवाच्या काळात महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागत आहे. अगोदरच अन्नधान्यासह दैनंदिन लागणा-या जवळपास सर्वच वस्तूंवर जीएसटी लावल्याने महागाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, महागाईचा हा धडाका थांबता थांबेना. जवळपास सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. आता त्यात सर्वसामान्यांचा हक्काचा नाष्टा असणा-या पोह्यावरही वक्रदृष्टी पडली असून, आता सर्वच प्रकारचे पोहे महागले आहेत. त्यामुळे महागाईचा झळा आणखी तीव्र होत चालल्या आहेत. यात सामान्य माणूस होरपळून निघत आहे.

किराणा दुकानातील दैनंदिन लागणा-या पॅकिंगच्या जवळपास सर्वच वस्तूंवर जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे दैनंदिन वस्तू महागल्या. त्यात पोह्याच्या पॅकिंगवरही जीएसटी लागू झाला आहे. त्यातूनच आता पोह्याचे दरही वाढले आहेत. सर्वच प्रकारचे पोहे महागल्याने आगामी काळात आता दिवाळीच्या फराळालाही दरवाढीची फोडणी बसणार आहे. किराणा दुकान किंवा मॉलवरील जवळपास सर्वच वस्तूंचे पॅकिंग असल्याने तेथील दैनंदिन लागणा-या सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने महागाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, यातून सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे.

केंद्र सरकारने किराणा दुकान, मॉलमधील जीवनावश्यक वस्तूंवर सरसकट जीएसटी लागू केल्याने अगोदरच अन्नधान्यासह दही, तूप, लोण्याचे दर वाढले आहेत. आता गूळ, पोह्यावरही जीएसटी लागू झाल्याने दगडी पोहे, जाड पोहे, भाजक्या पोह्याचे दर वाढले आहेत. एकीकडे कच्च्या मालाचा तुटवडा, इंधन दरवाढीमुळे दळणवळणाचा वाढलेला खर्च त्यात कच्चा मालासह पक्क्या मालावर लावण्यात येणारा कर याचा एकत्रित परिणाम मालाच्या किमतीवर जाणवू लागला आहे. पोह्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत.

अगोदरच कोरोना काळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. कोणाच्या नोक-या गेल्या, तर कोणी कर्ता पुरुष गमावला. यातून अजून सावरलेले नसतानाही महागाईचा आलेख वाढत चालला आहे. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातील कांदा पोहे, आठवणीतले वा सुदाम्याचे पोहे म्हणून ओळखल्या जाणा-या पोह्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचा नाष्टा महागला आहे.
काही बड्या उद्योगपतींच्या दबावामुळे सरकारने सर्वसामान्यांनावर जीएसटी लावल्याची ओरड व्यावसायिक करत आहे. विशेष म्हणजे २५ किलोच्यावर वस्तू घेतल्या, तर त्यावर जीएसटी नाही. २५ किलोच्या आतील वस्तू घेतल्या तर त्यावर जीएसटी आहे. २५ किलोवरचे धान्य घेणा-या व्यवहाराच्या त्यावर जीएसटी लागत नाही. एक दोन किलोचे धान्य विकताना ग्राहकांच्या माथी जीएसटीचा भार लादला जात आहे. त्यामुळे व्यापारीही संभ्रमात पडले आहेत.

गूळ, तूप, शेंगदाणे, डाळीचे दरही भडकले
सणासुदीच्या अगोदरपासूनच जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले असून, सर्व किराणा मालासोबतच गूळ, तूप शेंगदाण्यासह वेगवेगळ््या डाळीच्या भाववाढीची स्पर्धाही कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अर्थात, सामान्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिवडा, फराळही महागणार
गौरी-गणपती पाठोपाठ दसरा, दिवाळी येणार असल्याने सणांच्या तोंडावरच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीतील चिवडा, फराळदेखील महागणार आहे. अगोदरच दिवाळीत महागाईच्या झळा वाढल्या होत्या. आता फराळाचे साहित्यही महागल्याने यंदा फराळासाठी बजेट वाढणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या