वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेला महागाईचा सामना करावा लागत आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेतील महागाईचा दर चार दशकांतील उच्चांक ८.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यात गॅस, खाद्यपदार्थ आणि इतर बहुतांश वस्तू आणि सेवांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यूएस लेबर डिपार्टमेंटने शुक्रवारी डेटा जारी करत सांगितलं की, गेल्या महिन्यात वस्तूंच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ८.६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
एप्रिलमध्ये अमेरिकन बाजारातील वस्तूंची किंमत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ८.३ टक्क्यांनी वाढल्या. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती एक टक्क्यांनी वाढल्या आहेत. ही वाढ मार्चच्या तुलनेत खूपच जास्त होती. विमानाच्या तिकिटांपासून ते रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांच्या बिलांपर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्याने ही वाढ झाली आहे. सध्या चलनवाढही ६ टक्क्यांच्यावर पोहोचली आहे. एप्रिलमध्येही त्यात ०.६ टक्के वाढ नोंदवली गेली.
अमेरिकेत अशी परिस्थिती आहे की, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य अमेरिकन माणसाला जगणे कठीण झाले आहे. वृत्तसंस्था एपीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कृष्णवर्णीय समुदाय आणि गरीब लोकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. १९८२ नंतर प्रथमच या वर्षी मार्चमध्ये महागाई ८.५ टक्क्यांवर पोहोचली. चलनवाढीने अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हला व्याजदर वाढवण्यास भाग पाडले आहे.
विश्लेषकांनी अंदाज वर्तवला आहे की, येत्या काही महिन्यांत यावर नियंत्रण मिळवण्यात येईल. तरीही वर्षअखेरीस महागाई ७ टक्क्यांच्या खाली जाण्याची शक्यता कमी आहे. याबाबत जागतिक बँकेने अलीकडेच सांगितले होते की, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसला आहे. तसेच जगातील सर्व देशांना इशारा दिला होता की, जागतिक समुदाय अजूनही कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संकटावर लवकर तोडगा निघाला नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये महागाई भयंकर स्वरूप धारण करेल, असे जागतिक बँकेने म्हटले होते.