न्यूयॉर्क : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अशातच या युद्धादरम्यान जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताची आहे असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात करण्यात आला आहे. तसेच भारताच्या जीडीपीमध्ये वाढीचा अंदाज २०२२ मध्ये ६.४ टक्के असेल, जो मागील वर्षी ८.८ टक्के होता. असे असले तरी भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे असे या अहवालात सांगण्यात आले आहे. दरम्यान भारतात महागाईने डोके वर काढल्याचे नाकारता येणार नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाने बुधवारी वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स’ हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, २०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ३.१ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. जे जानेवारी २०२२ मध्ये जाहीर केलेल्या ४.० टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. जागतिक चलनवाढ २०२२ मध्ये ६.७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, २०१० ते २०२० च्या सरासरी २.९ टक्क्यांपेक्षा दुप्पट आहे. अन्नपदार्थ आणि ऊर्जेच्या किमतीही वाढत आहेत.
२०२२ मध्ये ६.४ टक्के वाढीचा अंदाज
या अहवालात म्हणण्यात आले आहे की, २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.४ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे, जो २०२१ च्या ८.८ टक्के विकास दरापेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष २०२३ साठी भारताचा विकासदर ६ टक्के आहे. युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्समधील आर्थिक विश्लेषण आणि धोरण विभागातील ग्लोबल इकॉनॉमिक मॉनिटरिंग शाखेचे प्रमुख हमीद रशीद म्हणाले की, पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया वगळता जगातील जवळजवळ सर्व प्रदेश महागाईने प्रभावित आहेत.
भारत चांगल्या स्थितीत : रशीद
रशीद म्हणाले की, भारत या बाबतीत चांगल्या स्थितीत आहे. भारताचे आर्थिक पुनरुज्जीवन नजीकच्या भविष्यात, म्हणजे पुढच्या वर्षी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. तथापि, जोखीम अद्याप संपलेली नाही. अहवालात म्हटले आहे की, बांगला देश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका येथील कृषी क्षेत्रातील उच्च किंमती आणि खतांसह कृषी उत्पादनांच्या कमतरतेमुळे मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो.