मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे दोन स्वदेशी युद्धनौका लॉन्च केल्या आहेत. यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही युद्ध नौका मेक इन इंडियाअंतर्गत भारतात निर्मिती केल्या गेल्या आहेत. दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका एकाच वेळी लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एमडीएलने म्हटले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लॉन्च केलेल्या या दोन्ही युद्धनौकांना पर्वत आणि शहराची नावे देण्यात आली आहेत. दोन्ही युद्धनौकांची रचना नौदल रचना संचालनालयाअंतर्गत करण्यात आली असून, याची संपूर्ण निर्मिती एमडीएल मुंबई येथे करण्यात आली आहे. सुरत ही नौका १५बी वर्गाची असून क्षेपणास्त्र विनाशक आहे, तर उदयगिरी ही पी१७ए वर्गाची दुसरी स्टेल्थ युद्धनौका आहे.
आयएनएस सूरत
आयएनएस सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १५बी चे पुढील श्रेणीतील स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर असून हे ७४०० टन वजनाचे आहे. याची लांबी १६३ मीटर इतकी असून वेग ताशी ५६ किलोमीटर असणार आहे. यावर बोटीसह चार ऑफिसर, ५० अधिकारी आणि २५० खलाशी साधारण ४५ दिवस समुद्रात राहू शकतात.
आयएनएस उदयगिरी
आयएनएस उदयगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १७ए ची तिसरी फ्रीगेट युद्धनौका आहे. स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज अशी आहे. यात उन्नत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे. नौदलाच्या या प्रकल्पांतर्गत देशातच ७ फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत.