नवी दिल्ली: पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने बोलतात, माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्याची आणि एका बँकेतील घोटाळ्याची त्यांनी चौकशी करावी.. ही मागणी केलीय खासदार सुप्रिया सुळे यांनी आणि तीही संसदेत. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची चर्चा मात्र आता सुरू झाली आहे.
सुप्रिया सुळे या संसदेत बोलताना म्हणाल्या की, तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही चौकशी लावा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. पंतप्रधानांनी बोलताना म्हटलं होतं की राष्ट्रवादी ही नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी आहे. त्यांनी त्या वेळी सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा संदर्भ दिला होता. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पंतप्रधानांची इच्छा पूर्ण करावी. या प्रकरणांची चौकशी करावी.
सुप्रिया सुळे बोलत असताना समोरच्या बाकावरून काहीतरी कुजबूज झाली. भाई के घोटाले का नाम लिया अशा आशयाची कुजबूज झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यालाही उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की संसदेत बसलेले माझे ८०० भाऊ आहेत, एकच आहे असं नाही.