बीजिंग : चीनमधील वुहान शहरातच सर्वात आधी कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला आणि इथून हा व्हायरस जगभर पसरला. जवळपास 78 दिवस कठोर अशा लॉकडाऊननंतर एप्रिलमध्ये या शहरातील लॉकडाऊन उठवण्यात आला. त्यानंकर पुन्हा नवीन प्रकरणं समोर आली. त्यामुळे आता या शहरानं चांगलीच कंबर कसली आणि संपूर्ण शहराचीच कोरोना टेस्ट करायला घेतली. फक्त 2 आठवड्यांतच जवळपास 65 लाख नागरिकांची कोरोना टेस्ट केली आहे. नेमकं हे शक्य आहे का? वुहानने हे केलं कसं?
वुहानमधल्या नागरिकांना कोरोना टेस्टसाठी रुग्णालयात जावं लागत नाही तर आरोग्य विभागचं त्यांच्यापर्यंत पोहोचतं. बांधकाम सुरू असलेली ठिकाणं, मार्केट आणि घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी लोकांच्या टेस्ट करत आहेत. लोकांनी आपल्या टेस्ट करून घ्याव्यात याची सूचना लोकांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून दिली जात आहे.
वुहानमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय वँग युआन यांनी सांगितलं, त्यांच्या परिसरातील सर्व लोकांची टेस्ट एकाच दिवसात पूर्ण करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिसरात शिबिरच आयोजित केलं होतं. तंबू ठोकून हे आरोग्य कर्मचारी टेस्ट करत होतो. एका दिवसात हजारो लोकांची टेस्टिंग करण्यात आली. यासाठी इतर राज्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली आहे, असं सांगितलं जातं आहे.
Read More लॉकडाउनमुळे विस्कटले निद्राचक्र
दरम्यान अशी मास टेस्टिंग केल्याने उलट कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका जास्त आहे, त्याचीही खबरदारी प्रशासन घेत असल्याचं सांगितलं जातं आहे. लोकांना एक निश्चित वेळ दिली जाते. त्या वेळत येऊन टेस्ट करण्यास सांगितलं जातं. जेणेकरून गर्दी होणार नाही. टेस्टिंग मोकळ्या ठिकाणीच केली दजाते आहे. टेस्टिंगच्या लाइनमध्ये दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी दोन मीटर अंतर ठेवण्यात येतं आहे. टेस्टिंगसाठी आलेल्यांना मास्क बंधनकारक आहे. प्रत्येक टेस्टनंतर आरोग्य कर्मचारी ग्लोव्हज बदलत आहेत.
एकिकडे इतर देशांमधील सरकार आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात मास टेस्टिंग करू शकत नाही आहे अशात चीनी सरकारनं कोरोनाच्या सेकंड व्हेवपासून वाचण्यासाठी संपूर्ण शहराच्या टेस्टिंगची योजना बनवली. पुढच्या पंधरा दिवसात संपूर्ण वुहानमधील सर्व नागरिकांची टेस्ट होणार आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगमधील व्हायरोलॉजिस्ट जिन डाँगयान यांच्या मते, चीन सरकारचा हा प्रयत्न गरजेपेक्षा जास्तच आहे. शिवाय आकडेही विश्वासार्ह नाहीत. इतक्या कमी वेळेत इतक्या प्रमाणात टेस्टिंग शक्यच नाही. उत्तम दर्जाच्या लॅबमध्ये कोरोना टेस्टसाठी वेळ लागतो. जशापद्धतीने टेंटमध्ये टेस्टिंग केल्या जात आहेत त्यामुळे चुकीचे आकडे समोर येऊ शकतात. ही टेस्टिंग प्रक्रिया वुहानच्या नागरिकांसाठी धोकादायक आहे. वुहानची ही टेस्टिंग प्रक्रिया इतर ठिकाणी फॉलो करण्याची गरज नाही.