नाशिक : आज शिवजयंतीच्या निमित्ताने नाशिकमध्ये शिंदे गटाच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दादा भुसे म्हणाले की, आम्ही कालपर्यंत सोबत होतो, तर चांगले मात्र आज अचानक एवढे वाईट झालो का? असा सवाल मंत्री दादा भुसे यांनी उपस्थित केला आहे. ‘हे वाईट आहे, मला अशा लोकांची कीव येते. कालपर्यंत सोबत सहका-यांबद्दल कुणी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कशी टीका करू शकतं’, असा गंभीर सवाल दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या आरोपानंतर उपस्थित केला आहे.
दादा भुसे यांची ठाकरे गटावर टीका
पुढे दादा भुसे यावेळी म्हणाले की, आज शुभ दिवस आहे. सध्या अनेक उत्सवांचं वातावरण असून ते साजरे केले जात आहेत. महाशिवरात्री, एकलव्य जयंती, त्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. देवाच्या आशीर्वादामुळे श्रीरामचंद्राचे, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवधनुष्य एकनाथ शिंदे यांना मिळालं. मात्र अशा पद्धतीने सुंदर वातावरणात असे आरोप करणे चुकीचे असल्याचेही भुसे म्हणाले.
संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही कालपर्यंत सोबत होतो, अवघे शिवसैनिक सोबत होते, आमचं गुणगान गायलं जात होतं, मध्यंतरीच्या काळात ही घटना घडली आणि आज आमच्यावर आरोप केले जातात. आज आम्ही वाईट झालो. कीव येते, अशा व्यक्तींची जेव्हा अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन कोणी काही बोलतं. सकाळी-सकाळी टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करत सुटतात, अशी टीका यावेळी भुसे यांनी केली आहे.
चांडाळ चौकडीनं शिवसेनेचा घात केला
यावेळी दादा भुसे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, अशा पद्धतीने टीका करणे चुकीचे असून आम्हीही बोलू शकतो, शिवसैनिक बोलू शकतो. घरात बसून शिवसेना वाढलेली नाही. यासाठी अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडवले आहे. अनेकांनी जिवाचं रान केलं आहे. खरं म्हणजे याच चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केल्याचा आरोप दादा भुसे यांनी केला आहे.