– शोएब अख्तरने व्यक्त केली खंत
लाहौर: वृत्तसंस्था
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक महान फलंदाज होता. त्याने २४ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोÞडले. भारतातच नव्हे, तर भारताबाहेरदेखील सचिनने गोलंदाजांची धुलाई केली. सचिनला बाद करणे हे त्याच्या काळातील प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असायचे. त्यातच विश्वचषक स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा असेल, तर प्रतिस्पर्धी संघाचा सचिनला बाद करण्याचा आनंद द्विगुणित व्हायचा. पण एका विश्वचषकात सचिनला बाद केल्याचे वाईट वाटले, अशी खंत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने बोलून दाखवली.
२००३ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरोधात भारताकडून खेळताना सचिन तेंडुलकरने ९८ धावांची खेळी केली. पण दुर्दैवाने शोएब अख्तरच्या एका बाऊन्सर चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यामुळे तेंडुलकर आणि भारतीय चाहत्यांना खूपच वाईट वाटले यात वादच नाही. पण त्याचसोबत सचिनला बाद करणाºया अख्तरलादेखील त्यावेळी सचिनचे शतक हुकल्याचे वाईट वाटले. त्याने स्वत: ‘हेलो’शी बोलताना याची कबुली दिली.
Read More जालन्यात पुन्हा सात पॉझिटिव्ह
सचिन ९८ धावांवर बाद झाला तेव्हा मला खूप वाईट वाटले होते़ त्याची खेळी खूपच खास होती, त्यामुळे त्या खेळीत त्याने शतक झळकवायला हवे होते़ मला स्वत:लासुद्धा सचिनचे शतक व्हावे असे वाटत होते. मला त्याने आधी एकदा बाऊन्सर चेंडूवर षटकार लगावला होता, त्यामुळे मी त्याला बाऊन्सर चेंडू टाकला. त्यावर सचिन षटकार ठोकेल असे मला वाटले होते, पण तो बाद झाला, असे अख्तर म्हणाला.
सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांची अनेकदा तुलना केली जाते. त्यावरही अख्तरने मत व्यक्त केले. या दोघांची तुलना करणे बरोबर ठरणार नाही. विराटला सचिनचा वारसदार मानले जात असून विराटनेदेखील कमी कालावधीत बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. पण तरीदेखील दोन युगातील दोन महान खेळाडूंची तुलना करणे अयोग्य आहे. सचिनने क्रिकेटच्या सर्वात कठीण युगात फलंदाजी करून स्वत:ला सिद्ध केले. जर तो आताच्या युगात क्रिकेट खेळत असता, तर त्याने सुमारे १ लाख ३० हजार धावांचा टप्पा ओलांडला असता, असे अख्तरने ‘हेलो’साठी दिलेल्या व्हीडीओ मुलाखतीत सांगितले.