छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतले आहे. जलील यांनी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर उपोषण मागे घेत असल्याची माहिती पत्रकारांना दिली, तर काही संघटनांकडून शहरात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने आपण उपोषण मागे घेतले असल्याचे जलील म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान याच निर्णयाला विरोध करत खासदार जलील यांनी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले होते. तसेच हे उपोषण आणखी किती दिवस सुरू राहणार याबाबत सांगता येणार नसल्याचे जलील म्हणाले होते. मात्र आज पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर आपण उपोषण मागे घेत असल्याची माहिती जलील यांनी दिली.