21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रसाडेतीन महिन्यांत जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेऊ ; आमदार महेश शिंदे

साडेतीन महिन्यांत जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेऊ ; आमदार महेश शिंदे

एकमत ऑनलाईन

सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीसांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. याचे प्रत्यंतर नुकतेच साता-यात आले. याठिकाणी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी आता थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ललकारले आहे.

येत्या साडेतीन महिन्यांत जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांच्या हातातून काढून सभासदांकडे देणार. मी जे बोलतो ते करतो, असे महेश शिंदे यांनी म्हटले. ते शुक्रवारी कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महेश शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

महेश शिंदे यांनी जरंडेश्वर कारखान्याची १०००० कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचे कर्तेधर्ते अजित पवार आहेत. अजित पवार यांनी कारखान्याच्या सभासदांना फसवत कारखाना गिळंकृत केल्याचे महेश शिंदे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर आगपाखड केली. स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणा-या चेल्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालू केले आहे, असे त्यांनी म्हटले.

यावेळी महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही लक्ष्य केले. शरद पवार यांनी रयत शिक्षणसंस्था हडप केली, असा आरोप त्यांनी केला. जरंडेश्वर कारखानासुद्धा तुम्ही चोरला आहे. हे जर तुम्ही सोडणार नसाल तर ती घ्यायची ताकद या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या मनगटात आणणार असल्याचे महेश शिंदे यांनी म्हटले. आमदार महेश शिंदे हे शिवसेनेचे कोरेगावचे आमदार असून ते सध्या एकनाथ शिंदे गटात सहभागी आहेत.

महेश शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. यामुळे आता महेश शिंदे ईडी किंवा अन्य कोणत्या चौकशीची मागणी करणार की, जरंडेश्वर कारखाना सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी नक्की कोणती खेळी खेळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या