नवी दिल्ली : शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी जेईई मेन २०२३ परीक्षेची अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. जेईई मेन २०२३ ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. यातले पहिले सत्र जानेवारी २०२३ मध्ये तर दुसरे सत्र एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे. या वर्षीदेखील जेईई मेनची संयुक्त प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेंिस्टग एजन्सीकडे (एनटीए) सोपवली आहे.
एनटीएने अधिसूचना जारी केली असून, पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवार, १५ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी परीक्षेत बसू इच्छिणारे विद्यार्थी एनटीए जेईई मेनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
जेईई मेनमध्ये दोन पेपर
मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेत (जेईई मेन) दोन पेपर असतात. पेपर १ हा (बीई/बी.टेक) साठी आहे. एनआयटी, आयआयटीएस आणि इतर केंद्रीय अनुदानित संस्था (सीएफटीआय) अनुदानित, मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठात अंडर ग्रॅज्युएट इंजिनीअरिंग प्रोग्राम्स (बीई/बी. टेक) मध्ये प्रवेश घेण्यासाठी हा पेपर असतो तर बी.आर्क आणि बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेपर २ घेतला जातो. याशिवाय जेईई मेन ही जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्रता परीक्षा आहे, जी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते.
जेईई मुख्य परीक्षा
मराठीसह १३ भाषांमध्ये
जेईई मेन-२०२३ परीक्षा १३ भाषांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.
सध्या तुम्ही पहिल्या सत्रासाठी अर्ज करू शकाल
जेईई मेन-२०२३ च्या पहिल्या सत्रात, फक्त सत्र १ दिसेल आणि उमेदवार त्याची निवड करू शकतात. पुढील सत्रात, सत्र २ दिसेल आणि उमेदवार त्या सत्राची निवड करू शकतात.
जेईई मेन २०२३: महत्त्वाच्या तारखा
-ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात : १५ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत सकाळी ९ पर्यंत
-क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट-बँकिंग/यूपीआयद्वारे अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख : १२ जानेवारी २०२३ रात्री ११:५० पर्यंत
-परीक्षा केंद्र शहरांची घोषणा : जानेवारी २०२३ चा दुसरा आठवडा
-एनटीए वेबसाइटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची उपलब्धता : जानेवारी २०२३ चा तिसरा आठवडा
-जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राच्या तारखा : २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२३
जेईई मेनसाठी बोर्ड परीक्षेच्या पात्रतेमध्ये सूट
जेईई-मेनद्वारे एनआयटी, ट्रिपल आयटी, जीएफटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी बोर्डाच्या पात्रतेमध्ये यंदाही सूट देण्यात आली आहे. यंदाही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जेईई-मेन रँकच्या आधारे एनआयटी, ट्रिपल आयटीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.