लखनौ : काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी १६ मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या मुख्यालयात पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे.
दरम्यान, कपिल सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, सपाच्या पाठिंब्याने सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. याशिवाय आणखी दोन लोक सभागृहात जाऊ शकतात, असे यादव म्हणाले. सिब्बल हे ज्येष्ठ वकील असून, यापूर्वीच्या काळात त्यांनी संसदेत अनेकदा चांगली मते मांडली आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, आगामी काळात ते समाजवादी पक्षाची आणि स्वत:ची मते सभागृहात मांडतील.
राज्यसभेच्या ११ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. या सदस्यांचा कार्यकाळ ४ जुलै रोजी संपत आहे. यासाठी २४ ते ३१ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १ जून रोजी होणार असून, ३ जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून, सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
या ११ जागांपैकी भाजपला सात आणि सपाला तीन जागा मिळणे जवळपास निश्चित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका जागेसाठी ३६ आमदारांचे मत आवश्यक आहे. भाजप आघाडीकडे २७३ आमदार आहेत. अशा स्थितीत त्यांना ७ जागा जिंकण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सपाचे १२५ आमदार आहेत. त्यांना ३ जागा जिंकण्यात काहीच अडचण नाही, मात्र ११ व्या जागेसाठी भाजप आणि सपा या दोघांमध्ये चुरस होऊ शकते.