पुणे : बहुचर्चित ठरणा-या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने शनिवारी सकाळी आपापले उमेदवार जाहीर केले. यात भाजकडून कसब्यातून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकिट देण्यात आले आहे.
तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना तिकिट देण्यात आले आहे.
कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक या आमदार होत्या. मात्र, कर्करोगाशी झुंजताना त्यांचा मृत्यू झाला. तर चिंचवडमधली जागा लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झाली होती. आता या दोन्ही जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. कसब्यातून हेमंत रासने यांना तिकिट मिळाले आहे.
त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर चिंचवडमधून भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. या ठिकाणी राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जगताप कुटुंबात कसलाही वाद नाही. काल टिळक कुटुंबीयांशीही चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारी न दिल्यामुळे टिळक कुटंब नाराज नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही कसबा आणि चिंचवडची निवडणूक एकत्र लढणार आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, नुकत्याच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला केवळ एक जागा मिळाली. तर महाविकास आघाडीच्या खात्यात तीन जागा गेल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. आता या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.