ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली असून तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
केतकी चितळेविरोधात वर्ष २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.