27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रकेतकी चितळे प्रकरण: महिला आयोगाने मागितले पोलिसांना स्पष्टीकरण

केतकी चितळे प्रकरण: महिला आयोगाने मागितले पोलिसांना स्पष्टीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली. तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ (अ) लावल्यावरून आता पोलिस अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांतील वरिष्ठ अधिका-याने या प्रकरणात कळवा पोलिस स्टेशनमधील जबाबदार अधिका-याने केतकी चितळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ (अ) का लावले याचे उत्तर आणि अहवाल मागितला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्दबातल ठरवलेल्या कलमाचा गैरवापर झाल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिका-यांनीही याबाबत अहवाल मागवला आहे.
अभिनेत्री केतकी चितळे अटक प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना समन्स पाठवून उत्तर देण्यास सांगितले होते. समन्सनंतर महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोगाला कारवाईचा अहवाल पाठवला.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी दिल्लीत काल (१७ जून) सुनावणी झाली. महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या वतीने विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे हे आयोगासमोर हजर झाले. यावेळी रेखा शर्मा यांनी अहवालावर आक्षेप घेतला होता. त्यांना या अहवालातील त्रुटी काढल्या.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले कलम ६६ अ का लावण्यात आले? प्राथमिक तपासापूर्वीच केतकी चितळेला अटक का करण्यात आली? याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आयोगाने मिलिंद भारंबे यांना दिले आहेत. त्यानंतर आता त्यांनी ठाण्यातील कळवा पोलिसांतील जबाबदार अधिका-यांना या प्रकरणातील त्रुटींबाबत जाब विचारला आहे.

आयोगाने असेही निरीक्षण नोंदवले की अदखलपात्र प्रकरणांमध्ये पोलिस वॉरंटशिवाय अटक करू शकत नाहीत. परंतु या प्रकरणात कोणतेही वॉरंट जारी केलेले नाही. पोलिसांनी राजकीय सूडबुद्धीच्या आधारावर कारवाई करू नये तर प्रत्येक प्रकरणात निष्पक्षपणे कारवाई करावी, असेही आयोगाने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या