नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह काही दिवसांवर येऊन पोहोचला असून देशभर त्याची धूम पाहायला मिळत आहे. यंदा देशभरात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे खादी ग्रामोद्योगाला चांगले दिवस येतील, असे वाटत होते. मात्र, केंद्र सरकारने थेट ध्वजसंहितेत बदल करून पॉलिस्टर ध्वज निर्मितीला मान्यता दिली आहे. त्यामुळे याचा खादी ग्रामोद्योगाला फार मोठा फटका बसला आहे.
ध्वजसंहितानुसार राष्ट्रध्वज हे हाताने काढलेले किंवा विणलेल्या लोकर, सूत, शिल्क खादी कपड्यापासून बनवलेला असावा, अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु केंद्र शासनाने या तरतुदीत बदल करून यात पॉलिस्टर कापडाचा समावेश केला आहे. यामुळे देशातील खादी उद्योगाला मोठा फटका बसला आहे. खरे तर अधिकाधिक राष्ट्रध्वज खादी ग्रामोद्योगकडून करून घेतले असते, तर खादी ग्रामोद्योगाला गती मिळण्यास मदत झाली असती. परंतु केंद्र सरकारने थेट ध्वजसंहितेत बदल करून पॉलिस्टर राष्ट्रध्वज तयार करण्यास मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे अभियान काही महिन्यांपूर्वी राबविण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात खादीला राष्ट्रध्वज तयार करणे शक्य नाही. मात्र वर्षापूर्वी ही मोहीम हाती घेतली असती तर याचा नक्कीच फायदा खादी ग्रामउद्योगाला झाला असता. हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात तब्बल साडेसात लाख तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहेत.
या अभियानात राज्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान २४ तास ग्रामीण, शहरी, कुटुंब शाळा शासकीय कार्यालयावर दीड कोटी राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. दरम्यान पॉलिस्टरच्या ध्वज निर्मितीच्या मान्यतेमुळे याचा फायदा खादी ग्राम उद्योगाला होणार नाही.
नांदेड येथे खादी ग्रामोद्योग समितीद्वारे राष्ट्रध्वज निर्मिती केली जाते. येथील तिरंगा देशभरात पुरवठा केला जातो. मुंबईच्या मंत्रालयासह देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावरील फडकणा-या राष्ट्रध्वजासह अखंड देशभरात नांदेडहून राष्ट्रध्वज पाठवला जातो. देशात कर्नाटकमधील हुबळी जि. धारवाड व नांदेड या दोनच ठिकाणाहू देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठा होतो. नांदेड शहरात मराठवाडा खादी ग्रामउद्योग समितीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.
या शहरांत होते राष्ट्रध्वज निर्मिती
मराठवाड्यातील नांदेड शहरासह मुंबई, ग्वालियर, हुबळी आदी ठिकाणी खादी ग्रामोद्योगची ध्वज निर्मिती होते. राष्ट्रध्वजाची निर्मिती करणा-या देशभरातील निवडक केंद्रांत समावेश असलेली नांदेड येथील ऐतिहासिक संस्था म्हणजे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी १९६७ मध्ये स्थापन केलेल्या व त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी संगोपन केलेल्या या संस्थेचा कायापालट करण्याचे नियोजन केले होते.
उदगीरमधून कपड्याचा पुरवठा
राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून मागविले जाते. दरम्यान राष्ट्रध्वज निर्मिती करताना राष्ट्रध्वजाचा कपडा, शिलाई, स्वच्छता, आकार, सौंदर्य, रंग या सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. कापड, दोरी, लाकूड, शिवणकाम आदी बाबत बारकावे तपासूनच तिरंगा ध्वज पुढे पाठविला जातो.