Thursday, September 28, 2023

खुमखुमी की मजबुरी?

जगावर, मानवजातीवर सध्या कोरोनाच्या जागतिक महामारीचे संकट आहे व अवघे जग या संकटाशी प्राणपणाने लढते आहे़ काही सन्मान्य अपवाद वगळता बहुतांश देशांना या संकटावर नियंत्रण मिळविणे अद्याप शक्य झालेले नाही़ उलट कोरोनाशी लढता-लढता जगासमोर अर्थव्यवस्थाच संकटात सापडण्याचे दुसरे महासंकट आ वासून उभे आहे व ते कोरोनापेक्षाही महाभयंकर ठरण्याचे अंदाज व शक्यता आता बहुतांश अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत़ साहजिकच या संकटाच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेला चीन हा जगाच्या दृष्टीने आरोपीच्या पिंज-यात आहे.

चीनने कोरोनाचे संकट निर्माण केले, दडवून ठेवले व त्यामागे चीनचा मोठा कट आहे, असे आरोपही चीनवर होतायत! जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या जागतिक परिषदेतही सर्व देशांनी एकजूट दाखविल्याने अगोदर निष्पक्ष व वैज्ञानिक तपासणीची मागणी साफ उडवून लावणाºया चीनला अखेर शरणागती पत्करून ही तपासणी मान्य करावी लागलीच! त्यात भारताने प्रमुख भूमिका बजावली होती, हे ही ध्यानात घ्यावे लागेल़ चीनच्या विस्तारवादास व जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेत भारत कायमच चीनसाठी प्रतिस्पर्धी व अडथळा राहिलेला आहे. शिवाय आशिया खंडावर निर्विवाद वर्चस्व प्राप्त करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना भारतामुळे चापही बसतो आहे.

मात्र, तरीही भारत हा चीनसाठी प्रचंड मोठी बाजारपेठ असल्याने वरकरणी का असेना पण भारतासोबत सलोख्याचे संबंध असल्याचे भासवत राहणे चीनला भाग आहे. अगोदर अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर असलेल्या पाकिस्तानशी अमेरिकेने अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षित अंतर बाळगायला सुरुवात केल्यानंतर चीनने त्याचा फायदा उठवत पाकला आपल्या गोटात घेतले व नंतर पाकच्या आर्थिक दिवाळखोरीचा फायदा घेत त्याला आपल्या ताटाखालचे मांजर बनवून टाकले आहे़ श्रीलंकेलाही प्रचंड कर्ज देऊन त्या देशावर वर्चस्व निर्माण केले आहेच. आता नेपाळलाही गळाला लावले आहे. चीनच्या या विस्तारवादी हालचाली अजिबात लपून राहिलेल्या नाहीतच!

Read More  हे १९६२ साल नाही, कुरापती खपवून घेणार नाही’ चीनला खडसावले

चीनच्या या सगळ्या मनसुब्यांना खीळ बसतेय ती भारतामुळे ! भारताने मुत्सद्देगिरीचा वापर करीत अमेरिकेसोबतच्या आपल्या संबंधात केवळ सुधारणाच केलेली नाही तर ते मैत्रीचे व दृढ बनवले आहेत़ चीनला ते रुचलेले नाहीच़ कोरोनापूर्वीच्या या जागतिक राजकारणाच्या रचनेला आता कोरोनानंतर मात्र मोठी कलाटणी मिळालेली आहे़ आजवर चीनच्या विस्तारवादी धोरणाबाबत व महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेबाबत आपल्या स्वार्थापुरता विचार करून तटस्थता बाळगणारे देश कोरोना संकटानंतर मात्र, चीनबाबत खडबडून जागे झाले आहेत़ त्यांना चीनचा धोकादायक चेहरा दिसला आहे व ते सावध झाले आहेत.

साहजिकच चीनचा तुल्यबळ शेजारी म्हणून भारताबाबत चर्चा सुरू झाली आहे व या तुलनेत भारत जगाच्या दृष्टीने जास्त विश्वासार्ह व सुरक्षित राष्ट्र ठरत आहे़ त्यामुळे चीन अस्वस्थ होणे अटळच! चीनमधील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कोरोनानंतर आता चीनमधून बाहेर पडण्याची चर्चा सुरू झाली आहे व तसे घडले तर भारत त्यांची पहिली पसंती ठरणार, हे स्पष्ट झाले आहे़ भारतानेही ही परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे़ हे सगळे केवळ चीन सरकारलाच नव्हे तर चीनमधील सर्वसामान्य नागरिकांनाही अस्वस्थ करणारे आ़हे. कोरोनाची परिस्थिती चीन सरकारने हव्या त्या सक्षमतेने हाताळली नाही, अशीच चिनी नागरिकांची भावना झाली आहे व ती दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याने चीनच्या सरकारवरचा दबाव वाढत चालला आहे.

Read More  जी-७ परिषद सप्टेंबरमध्ये होणार, भारताला आमंत्रण मिळणार

त्यातच भारताने चीनचा धोका ओळखून मागच्या चार-पाच वर्षांत ४००० किलो मीटरच्या सीमेवर रस्तेबांधणी, पूलबांधणी, बंकर्सची निर्मिती असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेले आहेत व त्याने चीनच्या दादागिरीला चाप बसत असल्याने चीन बिथरलेला आहे़ अशा सगळ्या पार्श्वभूमीवर चीनने ऐन कोरोना संकटाच्या काळात सीमेवर भारतासोबत कुरापत काढत मोठ्या प्रमाणावर सैन्य, शस्त्रास्त्रांची जमवाजमव करत तणाव निर्माण करणे व भारताने कठोर आणि ठाम भूमिका घेतल्यावर अचानक नरमाईचा सूर धरणे मात्र, सैन्य माघारी न घेणे अशा ज्या नाट्यमय घटना घडत आहेत त्याचा सर्वांगाने परामर्श घेणे गरजेचे ठरते़ चीनची महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा, विस्तारवादी धोरण व त्यासाठी कुठल्याही थराला जाणारा देश ही ओळख नवी नाहीच! चीन भारताला अडथळा मानतो हे ही लपून राहिलेले नाही व धोक्याने कारवाया करून भूभागावर कब्जा करण्यात चीनचा हातखंडा आहे, हे ही जगजाहीरच!

त्यामुळे चीनने सीमेवर आगळीक करण्याचे आश्चर्य अथवा वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही आणि चीनची ही कृती धक्कादायक वगैरे अजिबात नाही. मात्र चीनने त्यासाठी कोरोना संकटकाळाचा मुहूर्त का निवडला? हा खरा प्रश्न! त्याचे उत्तर शोधताना वर विस्ताराने नमूद केलेली पार्श्वभूमी लक्षात घेऊन सध्याच्या स्थितीशी त्याची सांगड घालावी लागते़ ही सांगड घातल्यावर हे लक्षात येते की, कोरोनानंतर जागतिक राजकारण, विविध देशांमधील परस्पर संबंध व त्यामुळे जागतिक रचनेतील फेरबदल याची सुरुवात झाली आहे़ चीन व अमेरिका या दोन देशांच्या जागतिक वर्चस्वाच्या लढाईत आता भारत महत्त्वपूर्ण भूमिकेत राहणार आहे! भारताचे हे वाढते महत्त्व व जगात निर्माण झालेली ‘विश्वासार्ह देश’ ही प्रतिमा यापुढच्या काळात चीनसाठी व चीनच्या धोरणांसाठी तसेच महत्त्वाकांक्षेसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आह़े.

Read More  श्रमिकांपैकी ८० टक्के उत्तर प्रदेश आणि बिहारचे

त्यात ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचे सध्याचे धोरण ‘अमेरिका फर्स्ट’ हेच असले तरी चीनचा वारू रोखण्यासाठी अमेरिकेला भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेणे भाग आहे़ कोरोनानंतर जगातले इतर देशही भारताकडे झुकण्यास सुरुवात झाली आहे़ त्यामुळे चीनसाठी भारताला कायम अशांत ठेवणे, अस्थिर ठेवणे व संघर्षात ठेवणे भाग आहे़ मात्र, भारताविरुद्ध उघड उघड शत्रुत्वाची भावना प्रकट करणेही चीनला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीच़ त्यामुळे भारतासोबत सीमावादाच्या कुरापती काढून भारताला गुंतवून ठेवणे व जगासमोर सर्व शेजारी राष्ट्रांशी सतत संघर्ष सुरू असलेला अशांत देश अशी भारताची प्रतिमा तयार करणे, ही चीनची रणनीती आहे.

त्यासाठी चीनने सीमेवर फुत्कार टाकण्याची ही रंगीत तालीम केली आहे़ कोरोना संकटामुळे जगात स्वत:च संकटात सापडलेल्या व त्यामुळे देशातील आपल्याच नागरिकांच्या तीव्र नाराजीला सामोरे जावे लागत असलेल्या चिनी सरकारला जगाचे व आपल्या नागरिकांचे लक्ष कोरोना संकटाकडून इतरत्र वळविण्यासाठी असे काही तरी घडवत, राष्ट्रवादाचा नारा देणे भाग पडते आहे आणि म्हणूनच चीनने भारतावर मजबुरीतून हा फुत्कार टाकत लुटूपुटूची खुमखुमी दाखविली आहे़ मात्र, यावेळची खुमखुमी मजबुरीची व लुटूपुटूची असली तरी बदलत्या जागतिक रचनेत भारताचा अडथळा दूर करण्यासाठी चीन सर्वतोपरी व कुठल्याही थराला जाऊन कारवाया, कुरापती व प्रसंगी उघड-उघड संघर्षाचीही भूमिका घेणार हे उघड आहे़ त्यासाठी भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांना हाताशी धरणार हे उघड आहे़ नेपाळने भारताला डोळे दाखवण्यातून ते स्पष्टही झालंय! भारताला आता या नव्या आव्हानासाठी सर्वांगाने सज्ज रहावे लागेल, हे मात्र निश्चित!

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या