मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची पैठणी, खाद्य संस्कृती आहे तसा कोल्हापूरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे. तोच कोल्हापूरचा जोडा राज्यपालांना दाखवण्याची वेळ आली असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदूंमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना म्हटले की, राज्यपालपद हे मानाचे पद असते. त्या पदाचा मान राखणे हे त्या पदावरील व्यक्तीचे काम आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी याआधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला.
आता मुंबईबाबत असे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का आले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्रात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत, गड-किल्ले आहेत, पैठणीदेखील आहे. कोल्हापूरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे. आता राज्यपालपदावर बसलेल्या व्यक्तीला कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची वेळ आली आहे. सामान्य माणसाने कष्टातून कोल्हापुरी जोडा कसा प्रसिद्ध केला, हे दाखवण्यासाठी त्यांना हा जोडा दाखवावा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे अनवधानाने आले नसल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यपालपदी असलेले कोश्यारी काही ठिकाणी खूपच सक्रिय असतात. तर, काही वेळेस अजगरासारखे सुस्त असतात अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यपालांनी रखडवलेल्या १२ आमदारांच्या यादीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.