राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती : एमआयडीसीला दिले आदेश
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळ बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉनच्या इमारतीमध्ये दहा दिवसात कोविड रुग्णालय सूरू होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
Read More युवा उद्योजकाचा लाईव्ह फेसबुकवर विवाह
औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्यामुळे बाधित रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीमार्फत कोविड रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी 13 मे रोजी चिकलठाणा एमआयडीसीमधील मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीची पाहणी करुन त्या ठिकाणी नियोजित कोविड रुग्णालय उभारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनासह एमआयडीसीला दिले. त्याकरिता डीपीसीमधून निधी उपलब्ध करुन देण्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले.
त्यानुसार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कोविड रुग्णालय उभारण्याची कार्यवाही सुरु केली. या कोविड रुग्णालयाचे काम अंतीम टप्प्यात असून हे रुग्णालय पुढील दहा दिवसात महापालिकेकडे सुपुर्द करुन सूरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.