नवी दिल्ली : भारतरत्न, गानकोकिळा आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचा रॉलिंग स्टोन मॅग्जिनच्या २०० सर्वोत्कृष्ट गायकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांना यादीत ८४व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.
त्याचवेळी या यादीत दिवंगत पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांचाही समावेश आहे. याशिवाय दक्षिण कोरियाचे गायक ली जी-उन यांचाही समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर बीटीएसचा सर्वांत तरुण गायक जुंगकुकचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र गायिका सेलीन डिऑनला या यादीतून वगळण्यात आले असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
‘रोलिंग स्टोन’ने गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल लिहिले, ‘द क्वीन ऑफ मेलडी’चा मधुर आवाज ज्याने भारतीय पॉप संगीताचा पाया घातला. ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांमधून संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्यांनी आपल्या आवाजाने सुवर्णकाळाची व्याख्या केली. त्या महान पार्श्वगायक म्हणजे लता मंगेशकरजी. ज्यांनी आपल्या गायनाने अनेक अभिनेत्यांसाठी उत्तम गाणी गायिली. ज्यांनी ७,०००हून अधिक गाण्यांचे रेकॉर्ड केले.
आपल्या सुरेल आवाजाने जगभरात ओळखल्या गेलेल्या लता मंगेशकर यांचे फेब्रुवारी २०२२ मध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत ३६ हून अधिक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.