दोन मजुरांचा बेशुद्ध होऊन मृत्यू : विषारी वायू व घाण पाण्याच्या वासाने बेशुद्ध होऊन दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
लातूर : पाणी टंचाई समस्येच्या पार्श्वभूमीवर वांजरवाडा (ता.जळकोट) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक आडातील (विहीर) गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. चौघे मजूर या कामावर आले होते. काम सुरु केल्यानंतर दोन मजुरांचा बेशुद्ध होऊन मृत्यू झाला आहे तर दोन बेशुद्ध मजुरांवर लातूर येथे उपचार सुरु आहेत. हे चौघेही माळहिप्परगा (ता.जळकोट) येथील रहिवासी आहेत.
वांजरवाडा येथील श्री संत गोविंद माऊली मंदिराच्या शेजारी असलेल्या सन 1952 सालाच्या सार्वजनिक आडातील (विहीर) गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. 22 मे रोजी माळहिप्परगा (ता.जळकोट) येथील चार मजुरांनी हे काम सुरू केले होते. गाळ काढण्याचे काम सुरु करता क्षणीच आडाच्या तळाशी असलेला विषारी वायू व घाण पाण्याच्या वासाने बेशुद्ध होऊन दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आडात बेशुद्ध होऊन पडलेल्या या मजुरांना वर काढून उदगीर येथे व तेथून लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारात दरम्यान मारुती बापूराव पवार वय 30 वर्षे, परमेश्वर गणपती केंद्रे वय 29 वर्षे (दोघेही रा. माळहिप्परगा ता. जळकोट ) या दोघांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. विषारी वायू व घाण पाण्याच्या वासाने या मजुरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
Read More नांदेडला धक्का : कोरोनाबाधितांचा आकडा १२५ वर पोहोचला
त्यांच्या सोबतच काम करीत असलेले जयवंत बापुराव पवार (34) व श्यामगिर मारुती गिरी (35, रा.माळहिप्परगा) हे दोघे बेशुद्ध असून या दोघांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडे कळले आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात माळहिप्परगा येथील हे चारही मजूर वांजरवाडा येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक आडातील गाळ काढण्याच्या कामावर हजर होते. 73 फूट खोल असलेल्या आडातील गाळ काढण्यासाठी हे मजूर विहिरीच्या तळात जाऊन काम सुरु करतात न करतात तेच कदाचित आतील विषारी वायू व घाण पाण्याचा वास सहन झाला नसल्याने चक्कर येऊन ते लगेच बेशुद्ध पडले. सोबतच्या दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या तरुणांनी विहिरीकडे धाव घेतली व बेशुद्ध पडलेल्या मजुरांना व इतर दोघांना क्रेनच्या सहाय्याने त्यांनी बाहेर काढले.
लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले तर परमेश्वर गणपती केंद्रे यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले.तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला व अन्य दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अगदी तारुण्यात दोघांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 73 फूट खोल विहिरीत जाऊन आपला जीव गमवावा लागला. तर त्यांचे दोन सोबती बेशुद्ध आहेत. या दुर्घटनेमुळे माळहिप्परगा गावावर शोककळा पसरली आहे. मयत दोघांवर शवविच्छेदन करून त्यांच्या मूळगावी माळहिपरगा येथे पाठविण्यात आले आहे.