नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधा-यांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आले. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले गेले आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृहमंत्री फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली. दरम्यान, या आरोपानंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले असून, उद्धव ठाकरेंसह संपूर्ण टीम सोमवारी नागपुरात दाखल होणार आहे. या आठवड्यात राजकीय धमाका करण्याचा इशारा खा. राऊत यांनी दिला आहे.
भात्यात असलेले सगळे बाण घेऊन उद्धव ठाकरे मुंबईहून नागपूरला रवाना झाले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई उद्या सकाळी नागपुरात दाखल होणार आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि राऊत यांचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे हे अधिवेशनात सहभागी होणार आहेत, तर संजय राऊत विधिमंडळ भेट घेणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाही उद्धव ठाकरे नागपूरला आले होते. तसेच त्यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीतही सहभाग नोंदवला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच महाविकास आघाडीची बैठक झाली, या बैठकीत सरकारला घेरण्याची रणनिती तयार करण्यात आली होती. नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा उद्यापासून सुरू होणारा शेवटचा आठवडा असेल. पहिल्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार गोंधळ झाला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी नागपूरच्या भुखंडाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केले. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. यानंतर सत्ताधारी पक्षांच्या आमदारांकडून दिशा सालियान प्रकरण काढले गेले. या मुद्यावरून आमदार आक्रमक झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली.
ठाकरे गट आक्रमक
दिशा सालियन प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यांच्यावर आरोप करून या प्रकरणाच्या चौकशीसाठी फडणवीस यांनी एसआयटीचीही स्थापना केली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
आदित्य ठाकरे कोर्टात जाणार
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना घेरण्यात आले होते. आता आदित्य ठाकरे कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती आहे. दिशा सालियन प्रकरणात त्यांच्यावर जे आरोप केले, त्याबाबत अब्रुनुकसानीचा दावा आदित्य ठाकरे ठोकणार असल्याची माहिती आहे.