श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राहणा-या काश्मिरी पंडितांना दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा’, अशी धमकी वजा पत्र लष्कर-ए-इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेने दिली आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरक्षा दुप्पट, तिप्पट करा, तरीही तुम्ही मरणार
लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणा-या काश्मिरी पंडितांना धमकी दिली आहे. स्थलांतरित कॉलनीच्या अध्यक्षांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘सर्व स्थलांतरित आणि आरएसएस एजंट यांनी काश्मिर सोडून जावे, अन्यथा मरायला तयार व्हा. काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्राईल करून काश्मिरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट, तिप्पट केली, तरीही तुम्ही मरणार’ अशी धमकी देण्यात आली आहे.