मुंबई : अदानी-हिंडेनबर्ग वादाचा परिणाम एलआयसीवरही होताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे एलआयसीचा समभाग आजवरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एलआयसीचा शेअर शुक्रवारी ५८४.७० रुपयांवर बंद झाला, जो त्याच्या सर्वकालीन नीचांकी ५८२ रुपयांच्या वर आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर एलआयसीचे शेअर्स जवळपास १७% घसरले आहेत. गेल्या महिन्यात २४ जानेवारीला जेव्हा हिंडेनबर्ग अहवाल आला तेव्हा एलआयसीचा शेअर ७०२ रुपये होता.
२४ जानेवारी रोजी अदानी समूहाच्या समभागांमध्ये एलआयसीचे एकूण गुंतवणूक मूल्य ८१,२६८ कोटी रुपये होते, जे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ३२,००० रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यानुसार अदानी समूहात गुंतवणूक केल्याने एलआयसीला आतापर्यंत ५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
समभाग ५.११ टक्क्यांनी घसरले
शुक्रवारी अदानी समूहाच्या १० पैकी ८ कंपन्यांचे समभाग घसरले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग ५.११% घसरले. याशिवाय अदानी ट्रान्समिशन, पॉवर, टोटल गॅस आणि ग्रीन एनर्जीमध्ये ५-५% घट झाली आहे. तर एनडीटीव्ही ४.२२%, अदानी विल्मर २.२२% आणि एसीसी ०.०३२% ने घसरले. फक्त अदानी पोर्ट्स १.४४% आणि अंबुजा सिमेंट २.२६% वाढले.