22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रसाहित्यिक, रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे : शरद पवार

साहित्यिक, रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे : शरद पवार

एकमत ऑनलाईन

देशात विशिष्ट विचारधारेचा प्रोपगंडा
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा थाटात
उदगीर : आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. यातून देशात एका विशिष्ट विचारधारेचा प्रोपगंडा केला जात आहे. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. मुळातच प्रचार साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. यासाठी साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त दामोदर मावजो, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, श्रीमती उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मनोहरराव म्हैसाळकर आदी उपस्थित होते.

साहित्यिकांनी कोणत्याही विचारधारेला बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते. समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थप्रमाणे पाहावयास हवे. राज्यकर्ते मतप्रचार थेट करीत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन मतप्रचार राबविणे सुरू केले आहे.

कवितांची पुस्तके आज कमी होत चालली आहेत, अशी खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली. काव्यसंग्रह निर्मिती प्रकाशनाच्या अर्थकारणाचे गणित जुळत नसल्याने हे घडत असावे, असे मला वाटते. नव तंत्रज्ञान आणि बदललेल्या सवयी, परभाषेचे आक्रमण, मनोरंजनाच्या साधनाची रेलचेल, मराठी शिक्षणाकडे कमी होत चाललेला ओढा यामुळे ग्रंथ प्रकाशन संस्थांची आर्थिक परिस्थितीही खालावत चालली आहे, हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या स्वर्गीय आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणा-या, संगीत विश्वात अजरामर झालेल्या स्वरसम्राज्ञी लतादीदींचे नाव संमेलननगरीस दिले याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. लतादीदींनी आपल्या अमृतमय कंठाद्वारे कोट्यवधी रसिकांना मंत्रमुग्ध केले. साहित्यविश्वाने याच ऋणानुबंधातून लतादीदींना दिलेली ही एक सार्थ आदरांजली आहे असे मी मानतो, असेही ते म्हणाले.

पाच वर्षांत एकदा तरी महिला अध्यक्षा व्हाव्यात
साहित्यविश्वातही राजकारणाचा शिरकाव झाला आहे. याचा अत्याधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो. महामंडळाने निवडणूक पद्धतीत एखादे महिला समावेशक धोरण आणले तर त्याचे मी प्रथम स्वागत करेन. महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हाव्यात, अशी तरतूद असावी, असे पवार म्हणाले.

संशोधनात्मक लेखनाची वानवा
साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा आज जाणवते. संशोधनात्मक लिहिले जात असेल. परंतु ते वाचकांपर्यंत पोहोचत नसावे. विशेषत: ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्र्कीक माहिती आधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे.

संशोधनाचा विषय संशोधनक्षम द्यावा
विद्यापीठांनी मराठीत पीएच डी साठी विषय देताना तो संशोधनक्षम द्यावा, केवळ संकलनक्षम देऊ नये. सखोल संशोधनानंतर झालेले साहित्य माहितीचे नवे भांडार ठरू शकते, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

सत्तेचा माज चढला की, निर्बंध लादले जातात
सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात. अशावेळी साहित्यिक गप्प का बसतात, असा सवाल उपस्थित करतानाच आज साहित्यिकांमध्येही चिअर लीडर्स तयार झाले आहेत. ते सत्ताधा-यांच्या प्रत्येक कृतीला गुमान प्रोत्साहन देतात. यातून एकाधिकारशाही बळकट करताना फॅसिझमला खतपाणी मिळते, अशी खंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यांनी यावेळी बोलून दाखवली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत पुस्तकावरील बंदी रास्त होती का, काश्मीर फाईल्स चित्रपटात एकतर्फी चित्रण दाखवले, अर्धसत्य आहे असे काहींचे म्हणणे आहे, असे सांगतानाच त्यांनी साहित्य प्रफुल्लित ठेवायचे असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या