Saturday, September 23, 2023

एक जूनपासून लॉकडाऊन ५.0 !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा आज दि. ३० मे रोजी करण्यात आली असून, देशातील सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. १ जूनपासून हे दिशानिर्देश लागू होतील ते ३० जूनपर्यंत कायम असतील.

रात्रीची संचारबंदीही सुरूच
रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकार नंतर दिशानिर्देश जारी करणार आहे.

८ जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू होणार
मंदिर, मशिद, गुरुद्वारा आणि चर्च सुरू करण्यात येतील. अनेक राज्यांनी मॉल सुरू करण्याची मागणी केली होती. मॉलही टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. शाळा, कॉलेज दुसºया टप्प्यात उघडण्याची शक्यता आहे. तर ८ जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंटही सुरू करण्यात येतील. पण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांसह सलूनही सुरू होतील. पण त्यासाठी अटी लागू केली जातील. त्यांचे पालन करावे लागेल. पण राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

कुठेही जाता येणार
एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसेच, कुठेही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगीची घ्यावी लागणार नाही.

राज्यांकडे अधिक अधिकार
राज्यांना केंद्र सरकारने जास्त अधिकार दिले आहेत. बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे. केंद्र सरकारने बंदी हटवल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार आहेत.

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
२९ मे रोजी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी ३० मेरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी नव्या गाईडलाईन्स संदर्भात चर्चाही केली होती़ सर्वाधिक संक्रमण आढळलेली शहरे अर्थात, मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता/हावडा, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरमध्ये लॉकडाऊनचे नियम यापुढेही सुरू राहू शकतात, असे संकेत आधीच दिले होते़

लॉकडाऊनचे टप्पे
पहिला टप्पा २२ मार्च ते १४ एप्रिल
दुसरा टप्पा १५ एप्रिल ते ३ मे
तिसरा टप्पा ४ मे ते १७ मे
चवथा टप्पा १८ मे ते ३१ मे
पाचवा टप्पा १ जून ते ३० जून

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या