पुणे : सध्या महाराष्ट्रावर टोळधाडीच्या संकटाचं सावट आहे. त्यामुळे टोळधाड नष्ट करण्यासाठी ड्रोन, अग्निशामक बंबच्या माध्यामातून किटकनाशकांचा वापर केला जाईल, असं आश्वासन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत काही शेतकऱ्यांना अडचणींमुळे लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुण्यात खरीप पीक आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘टोळधाडीवर किटकनाशक फवारणीचं काम प्रगतिपथावर आहे. फायर ब्रिगेडचे बंब देखील फवारणीसाठी वापरण्यात आले. ट्रॅक्टरच्या फवारणीच्या ब्लोअरचा देखील वापर केला जात आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त किटकांचा नाश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने किटकनाशके मोफत देण्याचा प्रयत्न आहे. ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांची फवारणी करता येईल का? यासंदर्भात नियोजन सुरु आहे. एक-दोन दिवसात तोही प्रयोग सुरु करत आहोत.
Read More मित्रमंडळींना भेटा, फिरायला जा म्हणजे मनातील भीती दूर होईल -प्रकाश आंबेडकर
तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल
बोगस बियाणे प्रकरणी काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र कुणी बोगस बियाणे विक्री करत असेल, वाढीव दराने बियाणे आणि खताची विक्री करत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिला. चौथ्या टप्प्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल की वाढवला जाईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत कृषी विभागाला लॉकडाऊन नसल्याचं कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे. कृषी विभागानं यापूर्वीच शेतकऱ्यांना सूट दिलेली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आणखी सहकार्य केलं जाईल. एखादा शेतकरी शहरातून ग्रामीण भागात पेरण्यासाठी जाणार असेल तर त्यांना क्वारंटाईन भाग वगळून सवलत द्यावी, असंही भुसे यांनी नमूद केलं.
राज्यात मुबलक बियाणं आणि खतं उपलब्ध
दादा भुसे म्हणाले, ‘राज्यात मुबलक बियाणं आणि खतं उपलब्ध आहेत. युरिया 50 हजार मेट्रिक टन बफर स्टॉक केला जाणार आहे. त्यामुळं बियाणं आणि खताची टंचाई येणार नाही. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार आहे. काही ठिकाणी 50 टक्क्यांपर्यंत, तर काही ठिकाणी 10-15 टक्के पीक कर्ज वाटप झालंय. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 30 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 लाखांच्या आतील कर्ज असलेले शेतकरी पात्र आहेत. 19 लाख शेतकऱ्यांचे 12 हजार कोटी रुपये खात्यावर वर्ग झाले आहेत. 11 लाख शेतकऱ्यांचे साडेनऊ हजार कोटी रुपये लॉकडाऊनमुळे थांबलेले होते. मात्र लॉकडाऊन थांबल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल. या शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे सरकार भरणार आहे. त्यांना पिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.’
यासोबतच शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणं दिलं जात आहे. त्यामुळे एका गोणीमागे 10 ते 30 रुपये शेतकऱ्यांचा फायदा होतोय. कापूस, सोयाबीन, तूर, कांदा, मका, ज्वारी खरेदीचा आढावा घेण्यात आला आहे. 15 जूनपर्यंत खरेदी पूर्ण करायची सूचना केली असून ते उद्दिष्ट सफल होईल, असंही त्यांनी म्हटलं.